नाट्यसंमेलनाला ठेंगा अन शिवसेनेशी पंगा
By Admin | Updated: February 23, 2016 02:24 IST2016-02-23T02:24:43+5:302016-02-23T02:24:43+5:30
विदेशी शिष्टमंडळासोबत बैठक असल्याचे सांगत नाट्यसंमेलनातून लवकर काढता पाय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे मोजके पदाधिकारी सोबत घेत ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल

नाट्यसंमेलनाला ठेंगा अन शिवसेनेशी पंगा
ठाणे : विदेशी शिष्टमंडळासोबत बैठक असल्याचे सांगत नाट्यसंमेलनातून लवकर काढता पाय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे मोजके पदाधिकारी सोबत घेत ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत जवळपास दीड तास खलबते केल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या वेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग असल्याने विरोधकांची नेमकी कोणती प्रकरणे बाहेर काढली जातात किंवा त्यांच्या कोणत्या प्रकरणांवर अधिक लक्ष दिले जाते, या चर्चेला उधाण आले आहे.
पुढच्या वर्षी होणारी पालिकेची निवडणूक, परमार प्रकरणाचा तपास, बाळाराम म्हात्रे खून प्रकरणाला २५ वर्षांनी फुटलेली वाचा, शहरातील वेगवेगळे प्रश्न, मंजुरीच्या प्रतीक्षेतील अर्थसंकल्प, स्मार्ट ठाण्याचे आश्वासन असे अनेक मुद्दे सध्या तेजीत असतानाच खुद्द आयुक्तांसोबत खलबते झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. परिणामी, मुख्यमंत्र्यांनी थाप मारत, शिवसेनेसह नाट्यरसिकांना अंधारात ठेवत पालिका आणि पोलीस आयुक्तांकडून ठाणे काबीज करण्यासाठी बरीच माहिती गोळा केल्याची चर्चा दिवसभर रंगली. नाट्यसंमेलनाच्या समारोपावेळी विदेशी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक असल्याने कार्यक्रम घाईत उरकण्यात आला.
मेक इन महाराष्ट्रची एखादी बैठक असेल, असे गृहीत धरून संमेलनाचे आयोजक असलेल्या शिवसेनेनेही ती बाब फारशी मनावर घेतली नाही. पण, भाजपाचे पदाधिकारी, पोलीस आयुक्तांसोबत ते पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर गेल्याचे कळताच कलारजनीच्या वेळी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांत प्रचंड अस्वस्थता पसरली.
संमेलनाच्या व्यासपीठावर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना मेट्रोची प्रतिकृती भेट दिली आणि हा प्रकल्प लवकर मार्गी लावावा, असे सुचवले. त्यावर, चार वर्षांत मेट्रो धावेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून वेळ मारून नेली. शिवसेनेच्या नेत्यांनी मेट्रोच्या प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेण्यासाठी ही खेळी खेळल्याचे मानले जाते. पुढील कार्यक्र माला जायचे असल्याने सत्कार सोहळ्याची, भाषणांची संख्या कमी करण्याची सूचना त्यांनी केली. त्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेनेचेच अन्य नेते केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही मोजक्या शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्यांना फारशा मागण्या मांडता आल्याच नाहीत. त्यानंतर, मुंबईला निघालेले मुख्यमंत्री भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत थेट आयुक्तांच्या बंगल्यावर पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक मैत्री जपल्याचे भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना खाजगीत सांगितले.