ज्येष्ठांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ
By Admin | Updated: October 1, 2015 23:34 IST2015-10-01T23:34:46+5:302015-10-01T23:34:46+5:30
देशातील ११ कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाने लढा सुरू केला आहे. १४ वर्षांमध्ये २० लाख नागरिक या चळवळीमध्ये सहभागी झाले आहेत.

ज्येष्ठांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ
नामदेव मोरे, नवी मुंबई
देशातील ११ कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाने लढा सुरू केला आहे. १४ वर्षांमध्ये २० लाख नागरिक या चळवळीमध्ये सहभागी झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना पेन्शन, आरोग्य व विरंगुळा केंद्र या प्रमुख मागण्यांसह इतर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
भारत हा तरुणांचा देश असल्याचे प्रत्येक व्यक्ती सांगते. परंतु या देशामध्ये ११ कोटी ज्येष्ठ नागरिक राहात आहेत. यामधील अनेकांना वृद्धापकाळी सांभाळ करणारेही कोणीच नाहीत. औषधासाठी पैसे नाहीत. करमणुकीचे साधन नसल्यामुळे एकाकीपणाने ग्रासले असून अशा ज्येष्ठांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र शासनाने १९९९ मध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. परंतु त्याची तंतोतंत अंमलबजावणी होत नाही. प्रत्येक राज्याला ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु गोवा वगळता इतर राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे देशातील ज्येष्ठ नागरिकांनी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्यासाठी चळवळ सुरू केली आहे. नवी मुंबई या चळवळीचे केंद्र झाले आहे. चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. एस. पी. किंजवडेकर वयाच्या ८३ व्या वर्षी व डी. एन. चापके वयाच्या ७४ व्या वर्षीही देशभर फिरून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. किंजवडेकर यांनी सन २००० मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ व अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ या दोन संघटना उभारून राज्यातील इतर संघटनांना या छत्राखाली आणण्यास सुरवात केली. देशातील १६ राज्यांचा दौरा करून विभागनिहाय ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना बांधण्यास सुरवात केली. शासनाकडे पत्रव्यवहार करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
ज्येष्ठ नागरिक महासंघाने १४ वर्षांच्या वाटचालीमध्ये सनदशील मार्गाने हक्कासाठीची चळवळ उभी केली आहे. देशभरातून पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना पोस्टकार्ड पाठवून समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक वर्षी ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक परिषद आयोजित केली जाते. आतापर्यंत उदयपूर, लखनौ, विशाखापट्टनम, भोपाळ येथे परिषदा झाल्या आहेत. यासाठी देशातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून समस्यांवर चर्चा होते. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री, मंत्री व इतर लोकप्रतिनिधींना भेटून त्यांच्याकडे ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.