राष्ट्रवादीला खिंडार
By Admin | Updated: March 26, 2017 04:22 IST2017-03-26T04:22:18+5:302017-03-26T04:22:18+5:30
मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीच्या वाताहतीला सुरुवात झाली असली, तरी त्याला रविवारी खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादी

राष्ट्रवादीला खिंडार
राजू काळे / भार्इंदर
मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीच्या वाताहतीला सुरुवात झाली असली, तरी त्याला रविवारी खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांसह काही नगरसेवक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. यासंदर्भातील वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ते खरे ठरले आहे.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाअभावी भरकटला आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपाने त्यातील अचूक प्यादे आपल्या पटावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
अलीकडेच राष्ट्रवादीच्या अनिता पाटील व वंदना पाटील या दोन नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ध्रुवकिशोर पाटील व सुरेश खंडेलवाल हे भाजपात जाणार असल्याचे वृत्त ‘मॅरेथॉनच्या आडून प्रवेशाची तयारी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते.
तसेच जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना हसनाळे-शिंदे, नगरसेवक रवींद्र माळी हे सुद्धा भाजपात जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. यातील ध्रुवकिशोर व मोहन पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. सध्या ते गणेश नाईक गटाचे समर्थक मानले
जातात.
मोहन यांना पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवणक तसेच त्यांच्या शाळेतील काही वाद मिटवण्यासाठी त्यांनी कमळ हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे.
ध्रुवकिशोर व खंडेलवाल या विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात अमराठी राहत असल्याने ‘सबका साथ सब का विकास’च्या कमळात विराजमान होणे पसंत केले आहे. ज्योत्स्ना, खंडेलवाल हे गिल्बर्ट मेंडोन्सा गटाचे मानले जातात. मेंडोन्सा यांनी ज्योत्स्ना यांना २००४-०५ मध्ये महापौरपदी विराजमान करण्यासाठी पक्षातील त्यावेळच्या महापौर निर्मला सावळे यांना पक्षातून काढले. त्यांना पक्षात अनेक महत्त्वाची पदे देऊनही केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
नगरसेवक रवींद्र माळी यांनी सुरुवातीला शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तडजोडीत भाजपा सरस ठरले. राष्ट्रवादीचे नगरसेवक परशुराम म्हात्रेही भाजपात जाणार आहेत. राष्ट्रवादीचे हे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी रविवारी भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे आतापासूनच मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात होणार हे स्पष्ट झाले आहे.
ज्यांना स्थानिक नेतृत्वाने मोठे केले, त्यांनी तरी किमान पक्षांतर करणे बरोबर नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ स्वार्थासाठी पक्षांतर केले जात आहे.
-बर्नड डिमेलो, गटनेते, राष्ट्रवादी
भाजपात सध्या इच्छुकांची मांदियाळी सुरू आहे. निवडणुकीच्यावेळी इच्छुकांना उमेदवारी देताना पक्षाची दमछाक होणार आहे. त्यावेळी मात्र पक्षातील आयारामांवर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार आहे.
- प्रकाश नागणे,
प्रवक्ते