गायकवाड यांच्यासाठी राष्ट्रवादी सरसावली!
By Admin | Updated: April 1, 2016 03:05 IST2016-04-01T03:05:37+5:302016-04-01T03:05:37+5:30
जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या कारभारावर नाराजी दाखवत आमदारकीचा राजीनामा देऊ करणारे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र

गायकवाड यांच्यासाठी राष्ट्रवादी सरसावली!
डोंबिवली : जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या कारभारावर नाराजी दाखवत आमदारकीचा राजीनामा देऊ करणारे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी संपर्क केलेला नाही. मात्र, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी गायकवाड यांची समजूत काढण्याकरिता हालचाली सुरू केल्या आहेत.
रुसलेल्या गायकवाडांनी विधिमंडळ अधिवेशनाकडे पाठ फिरवली असली तरी अजून सत्ताधारी भाजपाने गायकवाड यांच्या नाराजीची थेट दखल घेतलेली नाही. जोशी यांनी रेतीमाफियांपासून वेगवेगळ्या प्रकरणांत कारवाई केल्याने गायकवाड यांच्या दबावापोटी जोशी यांना पदावरून दूर केले तर लोकांमध्ये नाराजी वाढीस लागेल, अशी भीती भाजपाला वाटते. यापूर्वी व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण आणि ई. रवींद्रन यांच्या बदलीच्या चर्चांनीही नाराजीचे सूर उमटले होते. त्यामुळे गायकवाड यांची नाराजी दूर करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे, प्रमोद हिंदुराव आणि आर.सी. पाटील यांनी फोन करून टोकाचे पाऊल न उचलण्याचा सल्ला गायकवाड यांना दिला. आपण तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊ, असे डावखरे यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या स्थानिक नेत्यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांच्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य टाळले असून मुख्यमंत्र्यांनीही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही अथवा प्रतिक्रिया दिलेली नाही. (प्रतिनिधी)
भिवंडीतील बेकायदा गोदामांवर जोशी यांनी कारवाई केली, तेव्हा खासदार कपिल पाटील यांनीही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना फडणवीस यांचाच पाठिंबा असल्याची चर्चा ठाण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात आहे.
गायकवाड यांनी राजीनामा देणे योग्य नाही. जर ते माझ्याकडे आले तर त्यांना मी मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन. जनतेने निवडून दिले असल्याने त्यांनी असा निर्णय घेणे अपेक्षित नाही. त्यासंदर्भात त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे.
- वसंत डावखरे, नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आमदार गायकवाड हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी असे विचलीत निर्णय घेऊ नये. पंतप्रधान मोदीलाटेतही ते निवडून आले आहेत. याचा अर्थ त्यांना जनाधार असून त्यांनी विशिष्ट गोष्टींसाठी राजीनामा न देता कायद्याच्या चौकटीत राहून लढा द्यावा. जनतेने त्यांना निवडून दिले आहे. याचा विचार करावा.
- प्रमोद हिंदुराव, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी