ठाणे जिल्ह्यात काँग्रेससह राष्ट्रवादी वाऱ्यावर, पालिकांसह नगरपंचायत निवडणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 07:00 AM2021-02-19T07:00:40+5:302021-02-19T07:00:56+5:30

Thane : दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी या मिनी विधानसभा असलेल्या या निवडणुकीकडे दुर्लक्ष केल्याने पक्षांना त्याची किंमत मोजावी लागली आहे.

Nagar Panchayat elections with Thane Municipal Corporation in Thane district | ठाणे जिल्ह्यात काँग्रेससह राष्ट्रवादी वाऱ्यावर, पालिकांसह नगरपंचायत निवडणूक 

ठाणे जिल्ह्यात काँग्रेससह राष्ट्रवादी वाऱ्यावर, पालिकांसह नगरपंचायत निवडणूक 

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस- राष्ट्रवादीने सपाटून मार खाल्ला आहे. दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी या मिनी विधानसभा असलेल्या या निवडणुकीकडे दुर्लक्ष केल्याने पक्षांना त्याची किंमत मोजावी लागली आहे. आता येत्या काळात कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई या महापालिका, अंबरनाथ-बदलापूर या नगरपालिका आणि मुरबाड- शहापूर या नगरपंचायतींच्या निवडणुका येऊ घातल्या असून, शिवसेना- भाजपने त्यासाठी जशी मोर्चेबांधणी केली, त्या प्रकारे ग्रामपंचायत निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही या दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी शहाणपण न घेतल्याने जिल्ह्यात हे दोन्ही पक्ष वाऱ्यावर सोडल्याची चर्चा आहे.
ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ असून, लोकसभेचे तीन मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात शिवसेना- भाजपचे वर्चस्व आहे. महाविकास आघाडीमुळे भाजपा अनेक शहरांच्या सत्तेतून बाहेर असली तरी आमदार- खासदारांच्या संख्येमुळे पक्षाची ताकद कमी झालेली नाही. त्या उलट महाविकास आघाडीत शिवसेना सहभागी झाल्याने राष्ट्रवादीसह काँग्रेसला अनेक ठिकाणी खारीचा का होईना सत्तेत वाटा मिळाला आहे. मात्र, श्रेष्ठींच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात दोन्ही पक्षांची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काँग्रेसची ताकद आधीच तोळामासा आहे. भिवंडी महापालिकेत झटका बसल्यानंतरही या पक्षाने बाेध घेतलेला नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ज्याप्रमाणे शिवसेना- भाजपाने यश मिळविले त्याप्रमाणे काँग्रेसह राष्ट्रवादीला ते मिळविता आलेले नाही. राष्ट्रवादीला १५८ पैकी अवघ्या ९ ते १० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. त्यातही स्वत:ला दिग्गज समजणाऱ्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरेंसह अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदूराव, महिला अध्यक्षा विद्या वेखंडे, अविनाश थोरात यांच्या शहापूर-मुरबाड या तालुक्यांत राष्ट्रवादीने सपाटून मार खाल्ला आहे. विशेष म्हणजे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहिजे तशी रसद पुरवूनही ती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत न पोहोचल्याने राष्ट्रवादीने मार खाल्ला आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या आवडत्या चेरपोलीसारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीतही पक्षाच्या नाकीनाऊ आले आहेत. आता शहापूर- मुरबाड या नगरपंचायतींसह अंबरनाथ- बदलापूर नगरपालिका, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई या महापालिकांची निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 
जाणकार नेतृत्वाअभावी लागली वासलात
कसदार आणि जाणकार नेतृत्वाअभावी केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या नेत्यांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची पार वासलात लागली. ग्रामपंचायत निवडणुकांत झालेल्या चुकांमधून बोध घेऊन आता काँग्रेस- राष्ट्रवादीचे श्रेष्ठी महापालिका, नगरपालिका अन्‌ नगरपंचायतींच्या निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nagar Panchayat elections with Thane Municipal Corporation in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे