व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी भाईंदरमध्ये मायलेकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:25 IST2019-12-20T23:24:33+5:302019-12-20T23:25:16+5:30
उत्तर भारतीय नगरसेवक एकवटले : आरोपी पोलीस हवालदार फरार

व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी भाईंदरमध्ये मायलेकास अटक
भार्इंदर : भार्इंदर पश्चिमेस टोमॅटोविक्रेता रमेश पाठक (५२) आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणातील आरोपी नयना मेहता व मुलगा निकुंज ऊर्फ लालू या दोघांना अटक केली आहे. उत्तर भारतीय नगरसेवकांनी भार्इंदर पोलिसांना भेटून पाठक हा पोलिसांच्या अत्याचाराचा बळी असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची व त्या पोलिसावर कारवाईची मागणी केली आहे.
शिवसेना गल्लीतील महेशनगरमध्ये राहणाऱ्या पाठक यांनी १७ डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नयना मेहता, त्यांचा मुलगा निकुंज व क्राइम ब्रँचचे पोलीस कदम या तिघांच्या नावांचा उल्लेख केला होता. नयना यांना पाठक यांनी त्यांची एक सदनिका तीन लाख या अनामत रकमेवर विनाभाडेतत्त्वावर दिली होती.
नयना या अनामत रकमेचे तीन लाख दिले नसल्याचा दावा करत ते पैसे देण्याची मागणी पाठक यांच्याकडे करत होत्या. तर, पाठक यांनी मात्र तीन लाख मेहता यांना सांगली वैभव बँकेतून काढून दिल्याचे व पैसे देऊनही सदनिकेचा करारनामा नयना देत नसल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.
पाच लाख देण्याबाबत नयना, निकुंज व कदम हे दबाव टाकत असल्याचे तसेच वकिलाकडे कागदपत्रे बनवण्यास घेऊन गेल्याचे पाठक यांनी नमूद केले आहे. कदम याने दमदाटी केली तसेच या तगाद्याने आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भार्इंदर पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून चिठ्ठीच्या आधारे तपास सुरू केला. नयना व निकुंज यांच्याकडे चौकशी सुरू केली.
दरम्यान, पाठक हे उत्तर भारतीय असल्याने याप्रकरणी भाजपचे उत्तर भारतीय नगरसेवक मदन सिंह, श्रीप्रकाश सिंह, पंकज ऊर्फ दरोगा पांडे, अशोक तिवारी, मीरादेवी यादव, भरत मिश्रा आदींनी भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले. पाठक यांनी पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून कदम नावाच्या पोलिसाचा शोध घेऊन त्याला निलंबित करा व गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा, अशी मागणी केली.
नगरसेवकांच्या मागणीनंतर पोलिसांनी त्याच रात्री पाठक यांचा मुलगा गोपालच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नयना व निकुंज मेहता आणि कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी याप्रकरणी मेहता मायलेकास पोलिसांनी अटक केली.