मुरबाड ग्रा. रुग्णालय अत्यवस्थ

By Admin | Updated: August 15, 2015 22:37 IST2015-08-15T22:37:44+5:302015-08-15T22:37:44+5:30

मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून सुमारे तीन वर्षे झालीत. नागरिकांना त्वरित उपचार मिळावे म्हणून त्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटरदेखील सुरू करण्यात आले.

Murbad Gram Hospital Worry | मुरबाड ग्रा. रुग्णालय अत्यवस्थ

मुरबाड ग्रा. रुग्णालय अत्यवस्थ

- प्रकाश जाधव,  मुरबाड
मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून सुमारे तीन वर्षे झालीत. नागरिकांना त्वरित उपचार मिळावे म्हणून त्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटरदेखील सुरू करण्यात आले. परंतु, डॉक्टर आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हे रुग्णालय समस्यांच्या विळख्यात सापडले असून तेथील किरकोळ आजार झालेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून उल्हासनगर किंवा कळवा येथे उपचारासाठी पाठविले जाते. या मूलभूत समस्या सोडविण्यास एकही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना पुढे येत नसल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या रुग्णालयावर तालुक्यातील सुमारे २०५ गाव व पाड्यांची जबाबदारी असल्यामुळे तेथील ओपीडीत दरदिवसाला सुमारे ४०० च्या आसपास रुग्ण येतात. शिवाय, राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच होणारे अपघात, प्रसूती तसेच तालुक्यातील सुमारे सात प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून संदर्भसेवेत आलेले रुग्ण, पोलीस स्टेशनकडून येणाऱ्या एमएलसी केसेसचे आरोपींवर उपचार अशा विविध प्रकारच्या कामांचा व्याप पाहता शासनाने मुरबाड रु ग्णालयाला तीन वर्षांपूर्वी उपजिल्हा रु ग्णालयाचा दर्जा दिला.
शिवाय, नागरिकांना तत्काळ उपचारांची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरदेखील मंजूर केले. परंतु, तेथील तज्ज्ञ डॉक्टर, एक्स रे मशीन आॅपरेटर, वैद्यकीय अधीक्षक, औषध निर्माण अधिकारी, कक्षसेवक, सफाईवाला या पदांसह आयपीएचएसअंतर्गत असलेली मंजूर रिक्त पदे, भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, अधिपरिचारिका, सफाई कामगार, रखवालदार, ओपीडी क्लार्क, लॅब टेक्निशियन तसेच ट्रॉमा केअर सेंटरसाठी ३ विशेष तज्ज्ञ अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. येथे केवळ शिकाऊ डॉक्टरच रुग्णांवर उपचार करीत आहेत. तसेच रुग्णांना पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नसून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नादुरुस्त असल्याने वेळोवेळी पाणीपुरवठा खंडित होत आहे.

काय आहे स्थिती?
-डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांची अनेक पदे, अनेक महिने आहेत रिक्त
-त्यामुळे महागडी मशिनरी राहते आहे वापराविना पडून
-रुग्णांचे होतात हाल
-त्यांना आधार घ्यावा लागतो खासगी हॉस्पिटल किंवा पूरक सुविधांचा
-आमदार कुठल्याही पक्षाचा असो किंवा आमदार मंत्री होवो, रुग्णालय अत्यवस्थच राहते.
-ज्यांची ऐपत आहे, ते महागडे उपचार घेतात. आदिवासी आणि गरीबांवर मरणाला सामोरे जाणे एवढाच पर्याय असतो.

Web Title: Murbad Gram Hospital Worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.