महापालिका करणार भटक्या श्वानांचे लसीकरण; पहिल्या वर्षी पाच हजार कुत्र्यांचे केले जाणार लसीकरण
By अजित मांडके | Updated: January 23, 2024 19:53 IST2024-01-23T19:53:01+5:302024-01-23T19:53:48+5:30
कुत्रा चावल्यावर रॅबीज होऊ नये या उद्देशाने आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

महापालिका करणार भटक्या श्वानांचे लसीकरण; पहिल्या वर्षी पाच हजार कुत्र्यांचे केले जाणार लसीकरण
ठाणे: कुत्रा चावल्यावर रॅबीज होऊ नये या उद्देशाने आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. हे लसीकरण मोफत केले जाणार असून केंद्राच्या संस्थेच्या माध्यमातून सध्या शहरातील भटक्या कुत्र्यांचा सर्व्हे सुरु झाला आहे. त्यानुसार एका वर्षात पाच हजार भटक्या श्वानांचे लसीकरण केले जाणार आहे. पुढील पाच वर्षे ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. लसीकरणाचा खर्च हा केंद्राच्या संस्थेमार्फत केला जाणार असल्याने त्याचा भार महापालिकेवर पडणार नसल्याचेही सांगितले जात आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला २५ हजाराहून अधिक भटके श्वान असल्याची माहिती दिली जात आहे. तर मागील वर्षी ७ हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले गेले आहे. तर महापालिका हद्दीत भटक्या श्वानांची दहशत मागील काही वर्षात वाढल्याचे चित्र आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १३ हजाराहून अधिक जणांना भटक्या कुत्र्यांच्या श्वान दंशाला सामोरे जावे लागले होते. आजही भटक्या कुत्र्यांची दहशत शहरात दिसून येत आहे. पालिकेने आता प्रभाग समितीनिहाय श्वानांची गणना सुरू केली आहे. कळवा परिसरापासून श्वान गणनेचे काम सुरू करण्यात आलेले असून त्यानंतर पालिकेच्या इतर भागात टप्प्याटप्प्याने श्वान गणना करण्यात येणार आहे. यानंतर २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत रेबीज लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. यात पाच हजार भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
देशभरातील भटक्या श्वानांच्या रेबीज निर्मुलनासाठी केंद्र सरकारकडून उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने पालिकांना भटक्या श्वानांसाठी रेबीज लसीकरण मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पाच वर्षे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने हा उपक्रम राबविण्याची तयारी सुरू केली होती. परंतु पशु वैद्यकीय विभागात पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी नाहीत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही मोहिम राबविणे शक्य नसल्यामुळे पालिकेने वर्ल्ड वेटरनिटी संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेचे शंभर स्वयंसेवक एकाच वेळी शहरात भटक्या श्वानांचे लसीकरण करणार आहेत. दिवसाला एक हजार श्वानांचे लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. क्षमा शिरोडकर यांनी दिली. भटके श्वानाच्या चाव्यानंतर नागरिकांना ‘रेबीज’ आजार होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्याच येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.