केवळ सहा होर्डिंग्जला बजावल्या पालिकेने नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:17 AM2021-02-09T01:17:14+5:302021-02-09T01:17:36+5:30

शौचालय बांधण्यापूर्वी उभारले होर्डिंग्जचे खांब, महासभेमुळे कारवाईची शक्यता धूसर

The municipality issued notices to only six hoardings | केवळ सहा होर्डिंग्जला बजावल्या पालिकेने नोटिसा

केवळ सहा होर्डिंग्जला बजावल्या पालिकेने नोटिसा

Next

ठाणे : रस्ते आणि पदपथांवर शौचालये, टपऱ्या, जाहिरात फलक उभारून महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आल्यानंतर यावर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी प्रशासनाला दिले होते. परंतु महासभेने यासंदर्भात ठराव केला असल्याने कारवाई करता येत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. परंतु दुसरीकडे एका संस्थेच्या सहा होर्डिंग्जला पालिकेने नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शौचालये आणि त्यावरील होर्डिंग्जला अभय मिळण्याची शक्यता आहे.

महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि पदपथांवर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिले होते. परंतु ठाणे महापालिका हद्दीत रस्ते, फुटपाथ, अडवून अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, शौचालये, विश्रांतीगृह अनधिकृतपणे उभारल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला होता. दुसरीकडे याबाबत सर्व्हे केल्याचा दावा यावेळी करण्यात येऊन रस्ते, फुटपाथ अडवून सुमारे २८ हजारांहून अधिक बांधकामे, होर्डिंग्ज उभारल्याचा आरोपही त्यांनी केला. तब्बल ३५०० अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचेही सदस्यांनी सांगितले होते. त्यानुसार सभापती संजय भोईर यांनी प्रशासनाची कानउघाडणी करीत अशा पद्धतीने उभारलेले होर्डिंग्ज, अनधिकृत बांधकामे, शौचालये, विश्रांतीगृह आदींवर तत्काळ कारवाई करण्याचे आणि पुढील बैठकीत याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. परंतु आता याबाबत कोणताही सर्व्हे करण्यात आलेला नाही. याउलट सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर एका संस्थेने सहा ठिकाणी शौचलय उभारण्यापूर्वी होर्डिंग्जचे काम केले असल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दुसरीकडे उर्वरित एकावरही कारवाई करता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. २०१८ मध्ये यासंदर्भात महासभेत ठराव झालेला असून, तो आधी रद्द करावा लागणार आहे. त्यानंतरच याबाबत योग्य तो निर्णय घेता येईल, असेही पालिका सूत्रांनी स्पष्ट केले. 

पालिकेच्या जाहिरात विभागाने ही भूमिका घेतली असून, दुसरीकडे इतर बांधकामांवर किंवा फुटपाथ अडविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार हे अतिक्रमण विभागाला आहेत. त्यामुळे आता अतिक्रमण विभाग याबाबत काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. परंतु तूर्तास शौचालयांवर उभारलेल्या होर्डिंग्जवर कारवाई करणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. एका संस्थेने चुकीच्या पद्धतीने शौचालय उभारण्याआधी होर्डिंग्जचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना नियमानुसार नोटीस बजावली आहे.
- मारुती खोडके, 
उपायुक्त, जाहिरात विभाग, ठामपा

Web Title: The municipality issued notices to only six hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.