करवसुलीसाठी पालिका कर्मचारी जाणार घरोघरी
By Admin | Updated: November 15, 2016 04:32 IST2016-11-15T04:32:04+5:302016-11-15T04:32:04+5:30
कर्मचाऱ्यांनी थकीत करदात्यांच्या घरी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. गीते यांनी दिले आहेत.

करवसुलीसाठी पालिका कर्मचारी जाणार घरोघरी
भार्इंदर : कर्मचाऱ्यांनी थकीत करदात्यांच्या घरी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. गीते यांनी दिले आहेत. थकीत मालमत्ताकरासह चालू आर्थिक वर्षातील कर जमा करण्यासाठी आयुक्तांनी रविवारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.
गेल्या तीन दिवसांत पालिकेने सुमारे १० कोटी मालमत्ताकर वसूल केला असला तरीही अद्यापही अनेक करदात्यांनी थकीत करासह चालू आर्थिक वर्षातील कर पालिकेत जमा केला नसल्याचे समोर आले आहे. यात मोठ्या थकबाकीदारांचा समावेश अधिक आहे. सकाळी १० ते रात्री, मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या करवसुलीला करदाते चांगला प्रतिसाद देत असले तरी अपेक्षित वसुली होत नसल्याचे समोर आले आहे. सरकारच्या आदेशानुसार या कराच्या वसुलीसाठी जुन्या हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारण्यासाठी पालिकेला १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिल्याने हा कर वसूल करण्यासाठी सुटीच्या दिवशीसुद्धा कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. १४ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करवसुली सुरू राहणार असल्याने सर्व थकबाकीदारांसह चालू वर्षातील कराचा अद्याप भरणा न केलेल्यांनी कर जमा करण्यासाठी, त्यांना आवाहनाच्या माध्यमातून प्रवृत्त करण्याचे निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यानुसार, त्यांनी कर्मचाऱ्यांनी थेट थकबाकीदारांच्या दारी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश दिले.
तसेच मोठ्या थकबाकीदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे दूरध्वनी व मोबाइलवर संपर्क साधण्याचे आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी)