महापालिकेचा रूद्रावतार
By Admin | Updated: April 26, 2017 00:22 IST2017-04-26T00:22:12+5:302017-04-26T00:22:12+5:30
शहराला राष्ट्रीय मानांकनापेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. महापालिका बेकायदा नळजोडण्या व पाणीगळती विरोधात विशेष मोहीम उघडणार आहे.

महापालिकेचा रूद्रावतार
उल्हासनगर : शहराला राष्ट्रीय मानांकनापेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. महापालिका बेकायदा नळजोडण्या व पाणीगळती विरोधात विशेष मोहीम उघडणार आहे. गळक्या वाहिन्यांमधून लाखो लिटर पाणी नाल्यात जात आहे. पालिकेकडे जलवाहिनी दुरूस्तीची अद्ययावत यंत्रणा नसल्याचे उघड झाले.
उल्हासनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांवर एका हंडयासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहराला एमआयडीसी कडून दररोज १२० एमएलडीपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असून लोकसंख्या सहा लाख गृहीत धरली आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला रोज १२० लिटर पेक्षा जास्त पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.
प्रत्यक्षात शहराची परिस्थिती वेगळी असून पालिकेला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शहराला आठवडयातून दोन दिवस तेही अपुरे पाणी मिळत आहे. या प्रकाराने नागरिक हैराण झाले आहेत. दोन महासभा पाणीटंचाईवरून गाजत असून हजारो नागरिकांना हातपंपाचे दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.
राष्ट्रीय मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लिटर पाणी गृहीत धरले आहे. तर मुंबईसारख्या मोठया शहराला प्रत्येक व्यक्तीमागे ५० ते ६० लिटर दिवसाला पाणी मिळते. याउलट शहराची स्थिती असून पाणीपुरवठा व लोकसंख्येनुसार प्रत्येक व्यक्तीला २०० लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पण तसे होत नसल्याने शहरातील पाणीवितरण योजना, पाणी गळती, ठप्प पडलेली ३०० कोटीची पाणीपुरवठा योजना आदींवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी शहरातील पाणी वितरणातील दोष कारणीभूत असल्याचे सांगितले. तसेच बेकायदा नळजोडणी व पाणीगळती साठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच मुख्य जलवाहिनीवर विनापरवाना घेतलेल्या नळजोडणीधारकांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे बेकायदा जोडणीकरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)