भिवंडीत रुग्णसंख्या वाढत असतांनाही सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यास मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 07:30 PM2021-04-15T19:30:28+5:302021-04-15T19:30:37+5:30

मागील वर्षी कोविड सेंटरवर केलेला कोट्यावधींचा खर्च वाया 

Municipal Corporation fails to set up well equipped health system despite increasing number of patients in Bhiwandi | भिवंडीत रुग्णसंख्या वाढत असतांनाही सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यास मनपा अपयशी

भिवंडीत रुग्णसंख्या वाढत असतांनाही सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यास मनपा अपयशी

Next

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १५ ) भिवंडी शहरात दुसऱ्या करोना लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना सुसज्य आरोग्य यंत्रणा उभी करण्यात भिवंडी मनपा प्रशासनास अपयश आल्याने शहरातील गरीब रुग्णांनाही खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ आली आहे . विशेष म्हणजे पालिकेने मागील वर्षी पहिल्या करोना लाटेत कोट्यावधींचा खर्च करून उभारलेली आरोग्य यंत्रणा कार्यान्वित न करता धूळ खात पडून असल्याने पालिका प्रशासना कडून स्वतःचे अपयश झाकून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारावर नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. 

                कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतांनाही मनपाकडे आज फक्त १३३ बेडचे एकच कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. लाखोंची लोकसंख्या असतांनाही मनपाने केवळ एकच कोविड सेंटर सुरु ठेवल्याने नागरिकांकडून मनपा प्रशासनाच्या हलगर्जी कारभारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. 

                भिवंडी शहरात मागच्या लाटेत सुरवातीला मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मागील मे, जुन मध्ये मृत्यू दर देखील १२ % एवढा होता. रुग्णसंख्या व मृत्यूदरात वाढ झाल्याने मागील वर्षी शहरात स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधांसह कोविड रुग्णालय सुरु केले होते. त्याचबरोबर शहरात खुदाबक्ष हाॅल, टाटा आमंत्रण, रईस हायस्कूल व वऱ्हाळ देवी हाॅल येथे देखील सुसज्य कोविड सेंटर सुरू केले होते. या कोविड सेंटरच्या उभारणीसाठी त्यावेळी लाखो करोडोंचा खर्च मनपा प्रशासनाने केला होता. मात्र त्याचा फायदा झाल्याने शहरातील मृत्युदर अवघ्या ३ % पर्यंत खाली आला व रुग्ण बरे होण्याच्या अकड्यांमध्ये देखील रोज वाढ होत राहिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सुरु केलेली ही सुसज्य यंत्रणा या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या वाढत असतांना देखील धूळ खात पडली आहे. हे सर्व कोविड सेंटर आज बंद आहेत. त्यामुळे कोरोना वाढत असतांना देखील मनपा प्रशासन गाफील का आहे याचे नेमकी कारण स्पष्ट होत नाही. 

               एकीकडे ऑक्सीजन विना आज अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असताना आयजीएम रुग्णालया बाहेर कोट्यवधी रुपयांचे ऑक्सीजन टॅंक फक्त काय शोभेसाठी लावले आहेत का असा सवाल देखील नागरिक उपस्थित करीत आहेत. आयजीएम रुग्णालयात ४५ व्हेंटिलेटर व टेली आयसीयू सारख्या अत्याधुनिक सुविधा असताना त्या यंत्रणा धूळखात ठेवून प्रशासन नक्की काय साध्य करत आहे असा सवाल देखील उपस्थित होत आहे. त्यातच मागील वर्षी करोना च्या पहिल्या लाटेत पालिकेने टाटा आमंत्रण येथील विलगिकरण सह भिवंडी शहरात खुदाबक्ष हॉल, रईस हायस्कुल ,वऱ्हाळ देवी हॉल असे मिळून तब्बल एक हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध ठेवले होते .परंतु नंतर ही सर्व यंत्रणा बंद केली व आता पुन्हा दुसऱ्या लाटेत फक्त खुदाबक्ष हॉल येथील केंद्र सुरू करून पालिका क्षेत्रा सह पालिका क्षेत्रा बाहेरील १८  खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची सोय उपलब्ध केली आहे. मात्र या खासगी रुग्णालयांमध्ये सध्या बेड व ऑक्सीजन उपलब्ध नसल्याने रुग्णांची उपचारा विना तडफड सुरू झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने मागील वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून सुरु केलेली यंत्रणा पुन्हा सुरु करावी अशी मागणी जोर धरत आहे. 

 

Web Title: Municipal Corporation fails to set up well equipped health system despite increasing number of patients in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.