Municipal Commissioner's appeal that Corona will be arrested in 15 days only if Thanekar supports | ठाणेकरांनी साथ दिली तरच १५ दिवसात कोरोना आटोक्यात येईल, महापालिका आयुक्तांना विश्वास

ठाणेकरांनी साथ दिली तरच १५ दिवसात कोरोना आटोक्यात येईल, महापालिका आयुक्तांना विश्वास

ठाणे : केंद्र आणि राज्य शासनामार्फत कोरोनाबाबतच्या अटी शिथील केल्या आहेत. त्यानुसार आता महापालिकेकडूनही तसे आदेश पारीत केले जाणार आहेत. परंतु गरज असेल तरच घराबाहेर पडा, मास्क वापरा, सोशल डिस्टेसींगचे पालन करा आणि शासन म्हणून आम्ही जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन केले तरच आपण या कोरोनावर मात करु शकू असे मत ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी व्यक्त केले. त्यातही ठाणेकरांची साथ लाभली तर आणि तरच येत्या १० ते १५ दिवसात कोरोना निश्चित आटोक्यात आणला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            महापालिका आयुक्तांनी सोमवारी ठाणेकरांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाण्यात विशेष करुन झोपडपटटी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ४५ टक्के असल्याचेही स्पष्ट केले. तसेच केंद्र आणि राज्याच्या तुलनेत ठाण्यात मृत्युचे प्रमाणही कमी असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना बाबतचे नियम शिथील करीत असतांना नागरीकांनी सोशल डिस्टेंसीगचे पालन करावे, गरज असेल तरच बाहेर पडावे, ५० वर्षे वयोगटातील नागरीकांनी आणि १० वर्षाच्या आतील मुलांनी घरीच राहावे असे आवाहनही केले. कामावर जातांना ताप आहे किंवा नाही, आॅक्सीजनचे प्रमाण कीती आहे, हे तपासूनच घरा बाहेर पडावे, खरेदीसाठी जात असतांना किंवा मॉर्निंग, रस्त्यावर फिरतांना तीन फुटांचे अंतर नेहमी ठेवावे, हे करीत असतांना मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. शहरात आता ८८ च्या आसपास अ‍ॅम्ब्युलेन्स उपलब्ध आहेत, येत्या काही दिवसात १०० हून अधिक अ‍ॅम्ब्युलेन्स उपलब्ध होतील, शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये कीती बेड शिल्लक आहेत, याची माहितीही आता एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहराच्या विविध भागात खास करुन झोपडपटटी भागात ५० फीव्हर क्लिनीक सुरु करण्यात आले आहेत. तसेच १ हजार जणांची टीम ही घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे काम करीत आहे. आता ही टीम कनेटंमेंट झोनमध्येही जाऊन काम करणार आहेत. कोरोना बाधीत रुग्णांसाठी ग्लोबल इम्कॅप्ट हब येथे १ हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरु आहे. तसेच म्हाडा अंतर्गतही १ हजार बेडचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. सद्यस्थितीत शहरात ८ हजार बेड उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. घरोघरी जाऊन अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वापटही करण्यात येत आहे. ठाण्यात नियम शिथील करण्यात येत असले तरी दुकाने सुरु करण्याबाबतही खरबदारी घेतली जाणार आहेत. रस्त्याच्या डाव्या बाजूची एका दिवशी आणि रस्त्याच्या उजव्या बाजूची एका दिवशी अशी आलटून पालटून दुकाने उघडी ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय झोपडपटटी भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.
परंतु या सर्वात ठाणेकर नागरीक म्हणून आपली साथ यात खुप मोलाची असणार असून आपण साथ दिली तरच येत्या १० ते १५ दिवसात आपण कोरोना निश्चितच आटोक्यात आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 

येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. त्यादृष्टीकोणातून नाल्यांची सफाई योग्य पध्दतीने सुरु आहे. तसेच आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका देखील सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Municipal Commissioner's appeal that Corona will be arrested in 15 days only if Thanekar supports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.