बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच मुंब्रा उड्डाणपूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:43 IST2021-09-26T04:43:38+5:302021-09-26T04:43:38+5:30

ठाणे/मुंब्रा : येथील मुंब्रा-शीळ-कल्याण आणि ऐरोलीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम ५० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. मात्र, हा पूल आताच ...

Mumbra flyover dangerous before construction is complete | बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच मुंब्रा उड्डाणपूल धोकादायक

बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच मुंब्रा उड्डाणपूल धोकादायक

ठाणे/मुंब्रा : येथील मुंब्रा-शीळ-कल्याण आणि ऐरोलीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम ५० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. मात्र, हा पूल आताच धोकादायक झाला असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप शनिवारी सकाळी ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला.

शनिवारी या पुलाची पाहणी करून त्यांनी ही बाब उघडकीस आणली. मुंब्रा-शीळ-कल्याण आणि ऐरोलीला परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्याच्या उद्देशाने मुंब्रा वाय जंक्शन येथे एमएमआरडीए उड्डाणपूल बांधत आहे. त्याच्या बांधकामाची पठाण यांच्यासह विक्रम खामकर, साकिब दाते यांनी पाहणी केली. बांधकामात वापरण्यात येत असलेल्या सळई अत्यंत कमकुवत असून, त्यांना रसायनांचा लेप लावला जात नाही. त्यामुळे या सळईंना गंज लागून त्या आतच तुटण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बांधकाम साहित्यही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने हा पूल पूर्ण होण्याआधीच धोकादायक झाला असून, त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे मुंबईत जशी पूल कोसळण्याची घटना घडली, तशी येथेही घडण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम सुरू असतानाच अशी अवस्था असेल तर हा पूल दहा वर्षे तरी टिकेल का? या पुलावरून अवजड वाहतूक होणार आहे. मात्र, स्वत:च्या फायद्यासाठी ठेकेदाराने जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे. या विरोधात आपण एमएमआयडीए, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे लेखी तक्रार करून एसएनसी या ठेकेदारावर कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Mumbra flyover dangerous before construction is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.