मुंबई उपनगर पश्चिमचा सनसनाटी विजय; ठाण्यात रंगला कबड्डीचा थरार

By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 4, 2023 03:48 PM2023-12-04T15:48:50+5:302023-12-04T15:49:11+5:30

कुमार गट सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

Mumbai Suburban West Zone gets sensational victory as The thrill of kabaddi was played in Thane | मुंबई उपनगर पश्चिमचा सनसनाटी विजय; ठाण्यात रंगला कबड्डीचा थरार

मुंबई उपनगर पश्चिमचा सनसनाटी विजय; ठाण्यात रंगला कबड्डीचा थरार

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पहिल्या डावातील मोठी पिछाडी भरून काढत मुंबई उपनगर पश्चिम संघाने कोल्हापूर संघावर विजय मिळवत कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली.

मुलांच्या या लढतीत कोल्हापूर संघाने पहिल्या डावात मुंबई उपनगर संघावर २२-१० अशी तब्बल १२ गुणांची आघाडी घेतली होती. सामन्यात कोल्हापूर सहज बाजी मारणार असे वाटत असताना मुंबई उपनगर पश्चिम संघाने दुसऱ्या डावात तुफानी खेळ करत चित्रच बदलून टाकले. संघाला विजयपथावर नेताना दिनेश यादव, रजत सिंग, प्रशांत पवार आणि ओम कुंडलेने चतुरस्त्र खेळ केला. हा सामना मुंबई उपनगर पश्चिम संघाने ४२-३८ असा जिंकला. या गटातील अन्य लढतीत सांगली संघाने नाशिक ग्रामीण संघाचा ६१-१६ असा मोठा पराभव केला. सांगली संघाच्या विजयात संग्राम जाधव, अश्फाक अख्तर आणि ओंकार राठोड चमकले. नाशिक ग्रामीण संघाकडून प्रसाद पटाईतने चांगला खेळ केला. मुलींच्या लढतीत मुंबई शहर पूर्व आणि बीड संघाने विजय नोंदवले. मुंबई शहर पूर्व संघाने नांदेड संघावर ६१-१८ असा विजय नोंदवला. आदिना काबिलकर, सई शिंदे आणि लेखा शिंदेने मुंबई उपनगर संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. बीड संघाने लातूर संघांवर ४३-३५ असा विजय मिळवला.

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी माजी महापौर आणि शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे, माजी सभागृह नेते अशोक वैती, अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार, अशोक शिंदे, माया आक्रे मेहेर, इराण महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षिका शैलजा जैन, मिरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी भेट देऊन कबड्डीपटूंना सदिच्छा दिल्या.

Web Title: Mumbai Suburban West Zone gets sensational victory as The thrill of kabaddi was played in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.