स्मार्ट ठाण्याचा निवडणूक विभाग ढेपाळला
By Admin | Updated: February 10, 2017 04:14 IST2017-02-10T04:14:54+5:302017-02-10T04:14:54+5:30
ठाणे शहर ‘स्मार्ट सिटी’ करण्याकरिता चकचकीत प्रेझेंटेशन करणारे महापालिका प्रशासन निवडणुकीच्या कामात पार ढेपाळले आहे

स्मार्ट ठाण्याचा निवडणूक विभाग ढेपाळला
ठाणे : ठाणे शहर ‘स्मार्ट सिटी’ करण्याकरिता चकचकीत प्रेझेंटेशन करणारे महापालिका प्रशासन निवडणुकीच्या कामात पार ढेपाळले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून दोन दिवस उलटल्यानंतर निवडणूक विभागाकडून आॅनलाइन यादी अपलोड झाली. एकाही उमेदवाराचे शपथपत्र आॅनलाइन दिसत नाही. भाजपाने अनेक गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिलेला असल्याने त्यांच्यासंबंधीची ही माहिती मतदारांपर्यंत जाऊ नये, याकरिता कुणी अप्रत्यक्ष हातभार लावत आहे किंवा काय, अशी कुजबूज आहे.
ठाणे शहर सहा महिन्यांत वायफायने कनेक्ट केले जाणार, पेपरलेस कारभार सुरू होणार, पालिकेच्या कामाचे कॉर्पोरेटायझेशन केले जाणार, अशा लंब्याचौड्या बाता मारल्या जात असल्या तरी निवडणूक विभागातील अनागोंदी, अनास्था पाहिल्यावर राजकीय पक्षांचे नेते, पत्रकार आणि मतदार कपाळावर हात मारून घेत आहेत. केवळ ब्लेझर घालून मिरवले म्हणजे महापालिकेचा कारभार कॉर्पोरेट दर्जाचा होत नाही, याचा धडा महापालिकेला मिळाला असेल, अशी टीका आता सुरू आहे.
निवडणुकीच्या रिंगणात नेमके किती उमेदवार आहेत, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बाद झाले, कोणी अर्ज मागे घेतले, याची माहिती अद्यापही पूर्णपणे पालिकेच्या वेबसाइटवर दिसत नाही. गुरुवारी सायंकाळी उमेदवारांची अंतिम यादी पालिकेने वेबसाइटवर रडतखडत अपलोड केली असून त्याची संगती लागत नाही. एकूणच आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशीच काहीशी गत पालिकेची झालेली आहे.
दोन दिवसांपूर्वी निवडणुकीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळेस पालिकेच्या याच हायफाय यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराचा अनुभव विविध अधिकाऱ्यांनी घेतला आहे. आपल्या धडाकेबाज निर्णयांकरिता ओळखले जाणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून संबंधितांवर कडक कारवाई का होत नाही, असा सवाल अधिकारी करू लागले आहेत. (प्रतिनिधी)