‘निसर्ग’मुळे महावितरणचे सव्वा कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:52 AM2020-06-06T00:52:35+5:302020-06-06T00:52:35+5:30

ठाणे ग्रामीणमध्ये फटका : १६८ खांब, ३२ किमी वीजवाहिन्या जमीनदोस्त

MSEDCL loses Rs 1.2 crore | ‘निसर्ग’मुळे महावितरणचे सव्वा कोटीचे नुकसान

‘निसर्ग’मुळे महावितरणचे सव्वा कोटीचे नुकसान

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : अतितीव्र निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा महावितरणच्या कल्याण परिमंडळाला बसला असून, त्यामुळे सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या वादळात १६८ विजेचे खांब, आठ रोहित्र व ३२ किलोमीटरच्या वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या आहेत. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून जवळपास सर्व भागांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे.
कल्याण मंडळ - १ कार्यालयांतर्गत डोंबिवली, कल्याण पूर्व आणि पश्चिम भागांत उच्चदाब वाहिनीचे आठ खांब व आठ किलोमीटर वीजतारा, लघुदाब वाहिनीचे आठ खांब व ५.३ किलोमीटर वीजतारा जमीनदोस्त झाल्या तर, सात रोहित्र नादुरुस्त झाले. कल्याण मंडळ - २ अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, टिटवाळा व ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चदाबाचे ४५ खांब व आठ किमी वीजतारा, लघुदाब वाहिनीचे ७८ खांब व सात किलोमीटर वीजतारा तसेच आठ रोहित्र कोसळण्यासोबतच १० रोहित्र नादुरुस्त झाले.
आपत्तीच्या या काळात मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंते सुनील काकडे, धर्मराज पेठकर, मंदार अत्रे (प्रभारी), किरण नागावकर या प्रमुख अधिकाऱ्यांसह सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार फिल्डवर कार्यरत होते. त्यामुळे अडचणीच्या काळातही कमी कालावधीत वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य झाल्याचा दावा महावितरणने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.

वसई, पालघरमध्येही मोठे नुकसान
वसई मंडळांतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागात उच्चदाब वाहिनीचे पाच खांब व १.२ किलोमीटर वीजवाहिन्या, लघुदाब वाहिनीचे २३ खांब व तीन किमी वीजवाहिन्या पडल्या असून, ११ रोहित्र नादुरुस्त झाले. पालघर मंडळांतर्गत पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, बोईसर भागात लघुदाब वाहिनीचा एक खांब व ०.२ किमी वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या, तर दोन रोहित्र नादुरुस्त झाले. याशिवाय, परिमंडळात सव्वा किलोमीटर भूमिगत वीजवाहिन्या नादुरुस्त झाल्या.

Web Title: MSEDCL loses Rs 1.2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.