खासदारांनी केला ‘रुक्मिणीबाई’चा पंचनामा
By Admin | Updated: April 1, 2016 04:45 IST2016-04-01T02:57:07+5:302016-04-01T04:45:46+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार गुरुवारी उघडकीस आला. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे कल्याणमधील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी

खासदारांनी केला ‘रुक्मिणीबाई’चा पंचनामा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार गुरुवारी उघडकीस आला. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे कल्याणमधील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाची पाहणी केली असता त्यात औषधांचा तुटवडा तसेच कालबाह्य औषधेही आढळली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
रुक्मिणीबाई रुग्णालयात देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या अर्धपुतळा स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी शिंदे यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाची पाहणी केली. त्यांच्यासोबत महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे व काही नगरसेवक होते.
शिंदे यांनी बाह्यरुग्ण, अपघात विभागाला भेट दिली तसेच औषधांच्या भांडारगृहाचीही पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना अनेक आजारांवरील औषधांचा तुटवडा असल्याचे दिसून आले. तसेच काही औषधे तपासली असता ती कालबाह्य असल्याची आढळली. त्यामुळे शिंदे यांनी डॉक्टरांना जाब विचारला.
केडीएमसीत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा प्रशासनावर कोणताही अंकुश नसल्याचे या भोंगळ कारभारातून स्पष्ट झाले. दरवर्षी रुग्णालयातील औषधांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. परंतु, औषध तुटवड्याची वस्तुस्थिती पाहता हा खर्च जातो कुठे, हा सवाल उपस्थित होत आहे.
रुक्मिणीबाई रुग्णालयाची पाहणी केली असता त्यात काही त्रुटी आढळल्या. त्या त्वरित दुरुस्त कराव्यात. तसेच सध्या उपलब्ध नसलेली औषधे लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे आदेश महापौर आणि येथील वैद्यकीय आरोग्य विभाग प्रशासनाला दिले आहेत. जेनरिक मेडिकल, थॅलेसिमिया आणि डायलेसिस केंद्र तातडीने सुरू करण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.
- डॉ. श्रीकांत शिंदे,
खासदार, कल्याण