शाळांतील भंगार हलवा, अन्यथा रस्त्यावर फेकू!
By Admin | Updated: May 9, 2017 00:56 IST2017-05-09T00:56:01+5:302017-05-09T00:56:01+5:30
केडीएमसीच्या शाळांच्या वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडगळीच्या तसेच जुन्या तुटलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हा भंगाराचा

शाळांतील भंगार हलवा, अन्यथा रस्त्यावर फेकू!
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीच्या शाळांच्या वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडगळीच्या तसेच जुन्या तुटलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हा भंगाराचा मुद्दा शनिवारच्या समितीच्या सभेत चांगलाच गाजला. शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी भांडार विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांना दूरध्वनीद्वारे तातडीने भंगार हटवा, अन्यथा रस्त्यावर फेकून देऊ, असे सुनावले. या भंगाराचे मूल्यांकन करून ती रक्कम शाळांच्या विकासासाठी वापरा, तत्काळ भंगार हटवा, असे आदेश घोलप यांनी शिक्षण विभागाला दिले.
महापालिकेच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घोलप यांनी नुकतीच महापालिकेच्या शाळा क्रमांक १ मध्ये घेतली. त्या वेळी त्यांना या शाळेतील वर्गांमध्ये अडगळीचे सामान मोठ्या प्रमाणावर ठेवल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणाहून पावसाळ्यात सापही निघत असल्याच्या तक्रारी घोलप यांच्याकडे या वेळी करण्यात आल्या. याचे पडसाद शनिवारच्या शिक्षण समितीच्या सभेत उमटले. तत्पूर्वी घोलप यांनी पवार यांना सुनावत भंगार तातडीने हलवण्याचा सूचना केल्या. सभा सुरू होताच सुनीता खंडागळे आणि आशालता बाबर यांनी आयत्या वेळचा प्रस्ताव दाखल करून भंगाराचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकांच्या बहुतांश शाळांमध्ये ही भंगाराची परिस्थिती आहे. यामुळे साप, मांजर, उंदीर यांचा सर्रासपणे वावर असल्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. सुमारे २० वर्षांपासून हे भंगार वर्गात खितपत पडले असून त्याचे मूल्यांकन करून अहवाल द्या, असे आदेश घोलप यांनी शिक्षण विभागाला दिले.
दरम्यान, शिक्षण विभागाकडे मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नसल्याची बाब चर्चेच्या वेळी समोर आली. यावर, प्रभागनिहाय कनिष्ठ अभियंत्याकडून अहवाल मागवण्याच्या सूचना घोलप यांनी केल्या.