मद्यधुंद आरटीओ एजंटच्या गाडीची दुचाकीला धडक
By Admin | Updated: December 1, 2015 09:10 IST2015-11-30T03:10:40+5:302015-12-01T09:10:58+5:30
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका दुचाकीला धडक देणाऱ्या विष्णू मुंढे (२४) या आरटीओ एजंटला नागरिकांनी चांगलाच ‘प्रसाद’ देऊन नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.

मद्यधुंद आरटीओ एजंटच्या गाडीची दुचाकीला धडक
ठाणे : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका दुचाकीला धडक देणाऱ्या विष्णू मुंढे (२४) या आरटीओ एजंटला नागरिकांनी चांगलाच ‘प्रसाद’ देऊन नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडी घेऊन पळून जाणाऱ्या त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
समतानगरमधील ‘रजनीगंधा’ सोसायटीमध्ये राहणारा विष्णू २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आपल्या साथीदारासह जात होता. भन्नाट वेगात असलेली ही गाडी ‘ओपन हाऊस’पासून कर्णकर्कश हॉर्नचा आवाज करीत सुसाट जात होती. त्याने हरिनिवास सर्कलजवळ पत्नी आणि मुलासह जाणाऱ्या अमित लिम्बे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते सुदैवाने बचावले. याचा जाब काही ज्येष्ठ नागरिकांनी विचारल्यावर मुंढेने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिवाय, गाडीत आरटीओ अधिकाऱ्याची टोपी असल्याचे सांगून त्याने दमबाजी करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला जमावाने बेदम चोप दिला. त्याच वेळी त्याच्यासोबत गाडीत असलेल्याने कार घेऊन पलायन केले. आता ती गाडी आणि टोपी कोणाची याबाबतचा तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. मुंढेला वाचविण्यासाठी त्याच्या अन्य एका साथीदाराने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘तो’ फोन लावणाऱ्या विष्णूच्या दुसऱ्या एका साथीदाराचा मोबाइलही गुन्हा दाखल होईपर्यंत पोलिसांनी जप्त केला होता. (प्रतिनिधी)