भाईंदरच्या उत्तन कोळीवाड्यात प्लास्टर पडून आईचा मृत्यू तर ४ मुली जखमी
By धीरज परब | Updated: July 14, 2023 18:29 IST2023-07-14T18:29:28+5:302023-07-14T18:29:40+5:30
भाईंदरच्या उत्तन, पातान बंदर भागात शुक्रवारी पहाटे मच्छीमार कुटुंबीय झोपले असताना घराच्या छताचे प्लास्टर कोसळून आईचा मृत्यू झाला तर तिच्या ४ मुली जखमी झाल्या आहेत.

भाईंदरच्या उत्तन कोळीवाड्यात प्लास्टर पडून आईचा मृत्यू तर ४ मुली जखमी
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन, पातान बंदर भागात शुक्रवारी पहाटे मच्छीमार कुटुंबीय झोपले असताना घराच्या छताचे प्लास्टर कोसळून आईचा मृत्यू झाला तर तिच्या ४ मुली जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर सदर घर रिकामे करण्यात आले आहे. मच्छीमार डेनिस बोर्जिस यांच्या एकमजली घरातील तळमजल्यावर त्यांची पत्नी सुनीता (४६) ह्या सोफ्यावर झोपल्या होत्या तर मुली स्नेहल (वय २५), श्वेता (वय १७), सानिया (वय १३) व डेन्सी बॉर्जिस (वय २२) ह्या खाली झोपल्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना शुक्रवारी पहाटे सव्वा चारच्या सुमार छताचे प्लास्टर कोसळले. त्यात सुनीता यांचा मृत्यू झाला. तर चौघी मुली जखमी झाल्या. डेन्सी ही जास्त जखमी झाली असून तिला स्टेला मॉरिस रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अन्य तिघींवर उपचार करून सोडण्यात आले.
महापालीकेच्या अग्निशमन दलास सव्वा आठ वाजता ह्या घटनेची माहिती मिळाली. दरम्यान अपर तहसीलदार निलेश गौंड, तलाठी अनिता पाडवी, पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे, अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे, अग्निशमन केंद्र अधिकारी जगदीश पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदत कार्याचे निर्देश दिले.
सदर घर २० ते २२ वर्ष जुने असून तीन वर्षां पूर्वी त्याची दुरुस्ती केल्याचे अग्निशमन दला कडून सांगण्यात आले. अपर तहसीलदार यांच्या निर्देशानंतर खबरदारी म्हणून सदर घर रिकामी करण्यात आले. घरातील वृद्ध महिला ओट्यावर बसूनच असल्याने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी उचलून त्यांना शेजारच्या घरात नेऊन ठेवले. घराचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. तर कुटुंबीयांची जवळपास पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या घटनेने कोळीवाड्यातील जुन्या घरांचा आणि त्यात राहणाऱ्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.