बदलापुरातील बहुसंख्य एटीएममध्ये खडखडाट
By Admin | Updated: May 5, 2017 05:48 IST2017-05-05T05:48:10+5:302017-05-05T05:48:10+5:30
बदलापूरमधील एटीएम मशीनमध्ये गेल्या महिनाभरापासून रोख रकमेची तीव्र चणचण भासत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप

बदलापुरातील बहुसंख्य एटीएममध्ये खडखडाट
बदलापूर : बदलापूरमधील एटीएम मशीनमध्ये गेल्या महिनाभरापासून रोख रकमेची तीव्र चणचण भासत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या महिनाभरापासून एटीएम मशीनमध्ये पैसेच नसल्याने लोक एटीएममध्ये वरचेवर जातात. मात्र, खाली हाताने त्यांना परतावे लागते. एटीएमची अखंड सेवा पुरवण्यात सर्वच बँका कमी पडत आहेत. एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याने बँकेतून पैसे काढण्याकरिता रांगा लावण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांत मिळून जवळपास ८० च्या वर एटीएम आहेत. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बॅँकांच्या एटीएमचाही समावेश आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्वच एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवत आहे.
काही बँकांच्या एटीएमवर ‘रोख रक्कम नसल्याने मशीन बंद’ असल्याचे फलक पाहायला मिळतात. अनेक एटीएमना पूर्णत: टाळे लावले आहे. शहरातील एटीएममध्येही पैशांचा खडखडाट आहे. यामुळे बँकांमधील गर्दी वाढली आहे. ज्यांना तातडीने रकमेची गरज आहे, त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. (प्रतिनिधी)