Morcha of residents demanding to cut illegal constructions in RG space | आरजी जागेतील बेकायदा बांधकामे तोडण्याच्या मागणीसाठी रहिवाशांचा मूक मोर्चा
आरजी जागेतील बेकायदा बांधकामे तोडण्याच्या मागणीसाठी रहिवाशांचा मूक मोर्चा

मीरा रोड - मीरा रोडच्या शांती पार्कमधील आमच्या हक्काच्या आरजी जागेतील अतिक्रमणं तोडून आमची खेळण्या-फिरण्याची जागा मोकळी करून द्या, बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणे आमदार व स्थानिक नगरसेवकांनो बंद करा, अशी मागणी करणारे फलक घेऊन लहान मुलांपासून वृद्धांनी मूक मोर्चा काढला.

शांती पार्कच्या गोकूळ व्हिलेजमधील 12 इमारतींलगतच्या आरजी जागेमध्ये भले मोठे प्रवेशद्वार, मोठे शेड तसेच मोठी बांधकामे बेकायदेशीररीत्या बांधण्यात आली आहेत. सदर बांधकामे पालिकेने अनधिकृत घोषित करून देखील तोडक कारवाई केलेली नाही. तर रहिवाशांचा सततचा पाठपुरावा आणि आंदोलनांमुळे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी देखील बेकायदा बांधकाम तोडण्याचे पत्र दिले होते. परंतु पालिका केवळ कागदीघोडे नाचवून कारवाईला टाळाटाळ करत असताना दुसरीकडे स्थानिक आमदार आणि नगरसेवक मात्र बेकायदा बांधकामांना संरक्षण देत असल्याने त्यांचा निषेध रहिवाशांनी चालवला आहे. 

दरम्यान शनिवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी देखील सदर आरजी जागेतील बेकायदा बांधकामे तोडण्याचे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्तांना दिले आहेत. परंतु पालिका आयुक्त मात्र कारवाईस टाळाटाळ करण्याची शक्यता वाटत आहे.  तसेच काही समाजकंटक प्रवृत्तीवर प्रतिबंधात्मक कारवाईची गरज रहिवाशांनी व्यक्त केली आहे. काल रविवारी सायंकाळी रहिवाशांनी युनिक गार्डन येथून मूक मोर्चास सुरुवात केली. आरजीच्या जागेत फिरून मग झेव्हियर्स शाळा ते गोकूळ व्हिलेज, शांती पार्क, बँक ऑफ इंडिया येथून फिरून पुन्हा आरजीच्या जागेजवळ मूक मोर्चाचा समारोप केला गेला. यावेळी मोठ्या प्रमाणात मीरा रोडचे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. 

या मूक मोर्चात लहान मुलां पासून वयोवृद्ध रहिवाशी सहभागी झाले होते . हात मध्ये त्यांच्या फलक होते. आमदार व स्थानिक नगरसेवकानो आमच्या आरजी जागेतील बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणे बंद करा. शांतीपार्कमधील अन्य राहिवाशांना देखील सदर आरजीचा करोडो रुपयांचा भूखंड आपल्या सर्वांचा असल्याने एकत्र येऊन लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. आरजी जागा आम्हाला खेळण्यास, फिरण्यास मोकळी करून उद्यान होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असा इशारा रहिवाशांनी दिलाय. 


Web Title: Morcha of residents demanding to cut illegal constructions in RG space
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.