महापालिका तिजोऱ्यांत नोटांचा पाऊस
By Admin | Updated: November 12, 2016 06:30 IST2016-11-12T06:30:46+5:302016-11-12T06:30:46+5:30
महापालिकांचा मालमत्ताकर व पाणीपट्टी थकवण्याकडेच बहुतांश धनाढ्यांचा कल असतो. मात्र, बड्या रकमेच्या नोटा सरकारने रद्द केल्यावर महापालिका कार्यालयात कर

महापालिका तिजोऱ्यांत नोटांचा पाऊस
ठाणे : महापालिकांचा मालमत्ताकर व पाणीपट्टी थकवण्याकडेच बहुतांश धनाढ्यांचा कल असतो. मात्र, बड्या रकमेच्या नोटा सरकारने रद्द केल्यावर महापालिका कार्यालयात कर व कराची थकबाकी भरण्याकरिता या नोटा वापरता येतील, हे कळताच अनेकांनी रांगा लावून कर भरला.
थकबाकीदारांना नोटिसा बजावून, कोर्टात दावे दाखल करून, घरासमोर बॅण्डबाजा वाजवून किंवा अगदी तृतीयपंथीयांना धांगडधिंगा करायला भाग पाडूनही जी करवसुली होत नव्हती, ती जादूची कांडी फिरल्यासारखी नोटा रद्द झाल्यामुळे झाल्याने महापालिकांच्या तिजोऱ्यांत बख्खळ भर पडली.
केडीएमसीच्या तिजोरीत १४ कोटी?
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत शुक्रवारी रात्री ८.१५ वाजेपर्यंत ९ कोटी १७ लाख ५१ हजार ९०० रुपयांची भर मालमत्ता करवसुलीमुळे पडली. रात्रीपर्यंत आणखी किमान ६ कोटी रुपयांची वसुली अपेक्षित आहे. केडीएमसीने करवसुलीकरिता मोहीम सुरू केली होती व थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याचा बडगा उगारला असतानाच नोटा रद्द करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. दुपारी ३ पर्यंत एकूण ५ कोटी ८६ लाख ३६ हजार २५७ रुपये करापोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. कल्याणमधील ५ केंद्रांवर ३ सर्वाधिक १ कोटी २३ लाख ४१५ रुपये इतका कर हा डोंबिवलीतील ‘ह’ प्रभागात, तर त्याखालोखाल १ कोटी १४ लाख ५६ हजार ५५ रुपये कर कल्याणमधील ‘ब’ प्रभागात जमा झाला.
ठामपाला साडेतेरा कोटींची कमाई
ठाणे : गुरुवारपासून शुक्रवार सायंकाळपर्यंत अवघ्या २४ तासांत मालमत्ता, पाणीपट्टी, जाहिरात आणि एलबीटीपोटी तब्बल १३.५० कोटींहून अधिकची वसुली झाली आहे. ठाणे महापालिकेने १० प्रभाग समित्यांमधील पाणीपट्टी व मालमत्ताकर वसुलीचे दोन्ही विभाग सुरू ठेवले. पाणीपट्टीची १.५० कोटीहून अधिक, तर मालमत्ताकराची ४.५० कोटींहून अधिकची वसुली झाली. जाहिरात करापोटी ४६ लाखांची विक्रमी वसुली झाली आहे. वसुली करण्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अतिरिक्त काउंटर सुरू केले व महापालिका मुख्यालयातील स्टाफही नियुक्त केला होता.
उल्हासनगरात ८ कोटी वसुलीचा विक्रम
उल्हासनगर : करवसुलीबाबतीत नेहमीच पिछाडीवर असलेल्या व तृतीयपंथीयांना घरासमोर धांगडधिंगा करायला लावून करवसुली करण्याचा टोकाचा निर्णय घेण्याची पाळी आलेल्या यामहापालिकेने गेल्या दोन दिवसांत ८ कोटींची करवसुली केली. मध्यरात्रीपर्यंत १० कोटींपर्यंत वसुली जाईल, अशी अपेक्षा आहे. उल्हासनगर महापालिकेची मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी ३६० कोटी रुपये आहे. करवसुलीकरिता स्थापन केलेल्या विशेष पथकाने एका महिन्यात २५० मालमत्ता जप्त केल्या असून ३९ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यापूर्वी मालमत्ताकर विभागाने महिला बचत गटाची मदत घेण्यापासून थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवून वसुली केली होती.