ठाणे: गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक (आरपीआय) नामदेव शिंदे यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार दोन महिला पोलीस कर्मचा-यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.दीड वर्षांपूर्वीच शिंदे यांची आरपीआय म्हणून ठाणे मुख्यालयात नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीपासूनच प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचा-यांशी त्यांचे वर्तन असभ्यपणाचे होते. काहींनी तसाच त्रास सहन केला. त्यांच्यापैकीच दोघींनी धाडस दाखवून याप्रकरणी थेट पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे एक महिन्यापूर्वी तक्रार करुन दाद मागितली. याची गंभीर दखल घेत प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्याकडे सोपविण्यात आले. रानडे यांनी मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. याच समितीने केलेल्या चौकशीमध्ये दहा वेगवेगळया महिलांनी शिंदे यांच्याकडून होणा-या छळाचा पाढाच वाचला. दरम्यान, ज्या दोन महिला पोलिसांनी शिंदे यांच्याविरुद्ध थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्यांनाच आरपीआय शिंदे यांनी जादा डयूटी देऊन त्रास देण्यास सुरुवात केली. तरीही गेल्या दोन दिवसांपासून त्या ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांची तक्रार घेतली जात नव्हती. अखेर या प्रकरणाचा पाठपुरावा करणा-या दोन्ही महिला पोलिसांनी तक्रारीबाबत आग्रह धरल्यानंतर बुधवारी दुपारी याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिला पोलिसांशी असभ्य वर्तन करणे, त्यांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिंदे हे प्रथमदर्शनी तरी दोषी आढळले असल्याने त्यांच्यावर याप्रकरणी कारवाई केली जाईल, अशी माहिती उपायुक्त डॉ. नाररवरे यांनी दिली.
ठाणे पोलीस मुख्यालयातील राखीव निरीक्षकाने केला दोन महिला पोलिसांचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:19 IST
सहायक आयुक्त निपुंगे यांच्याविरुद्ध महिला पोलिसाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असतांनाच आता निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याविरुद्धही दोन महिला कर्मचा-यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे पोलीस मुख्यालयातील राखीव निरीक्षकाने केला दोन महिला पोलिसांचा विनयभंग
ठळक मुद्देठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखलठाणे शहर आयुक्तालयात खळबळगेल्या आठ महिन्यांपासून सुरु होती छळवणूक