पालिकेवर मोर्चाचा बिल्डरांचा इशारा

By Admin | Updated: March 28, 2016 02:28 IST2016-03-28T02:28:32+5:302016-03-28T02:28:32+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेने घनकचरा प्रकल्प उभारण्यात दिरंगाई केल्याने उच्च न्यायालयाकडून नव्या इमारतींच्या बांधकामास स्थगिती देऊन वर्ष उलटले तरीदेखील घनकचरा

Module builders' hint on the policy | पालिकेवर मोर्चाचा बिल्डरांचा इशारा

पालिकेवर मोर्चाचा बिल्डरांचा इशारा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने घनकचरा प्रकल्प उभारण्यात दिरंगाई केल्याने उच्च न्यायालयाकडून नव्या इमारतींच्या बांधकामास स्थगिती देऊन वर्ष उलटले तरीदेखील घनकचरा प्रकल्प उभारण्यात प्रगती होत नसल्याने बिल्डरांची संघटना महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. बिल्डरांच्या संघटनेच्या बैठकीत मोर्चा काढण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
२००० साली उच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने घनकचरा प्रकल्प उभारला नाही. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने कचरा प्रकल्प उभारा, तरच नव्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी द्यावी, असे आदेश दिले. हा आदेश एप्रिल २०१५ मध्ये दिला. त्याला एक वर्ष पूर्ण होईल. महापालिकेकडून प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्याही ठोस हालचाली झालेल्या नसल्याने यासंदर्भात ‘एमसीएचआय’ या बिल्डरांच्या संघटनेच्या खडकपाडा येथील कार्यालयात एक बैठक घेतली.
या बैठकीस संघटनेचे पदाधिकारी प्रफुल्ल शहा, श्रीकांत शितोळे, दीपक मेहता, रवी पाटील आणि मिलिंद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. बांधकाम परवानगीस स्थगिती असल्याने बिल्डर बेजार झाले आहेत. त्याचबरोबर बांधकाम व्यवसायावर ज्यांचे पोट आहे, असे १२६ रोजगार करणारे मेटाकुटीला आले आहे. पालिकेस मिळणाऱ्या विकास शुल्काचे सुमारे १५० कोटी रुपये बुडाले आहेत.
२०० कोटींचे प्रकल्प रखडल्याने या प्रकल्पातून होणारी एक हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बांधकाम स्थगिती उठवण्यासाठी महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, घनकचरा प्रकल्प उभारण्यात फारशी प्रगती झालेली नाही. (प्रतिनिधी)

मोकळ्या जागेवरील कर (ओपन लॅण्ड टॅक्स) सगळ्यात जास्त या भागातील बिल्डरांकडून वसूल केला जातो. परिणामी, बिल्डरांची कोंडी झाली आहे. बिल्डर संघटनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात यावा, असा सूर सदस्यांनी लावला. बिल्डर सदस्यांच्या भावना लक्षात घेता लवकरच महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला.

Web Title: Module builders' hint on the policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.