मोदक व सामग्री ही महागली, यंदा असंख्या व्हरायटीज
By Admin | Updated: September 16, 2015 11:50 IST2015-09-15T23:02:23+5:302015-09-16T11:50:56+5:30
मोदकांमध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या तांदळाचे पीठ, नारळ, गूळ, वेलची आदी पदार्थाचे दर वाढल्याने यंदा मोदक ही महागले आहेत. या किंमती मागील वर्षीच्या तुलनेत एका नगामागे सहा

मोदक व सामग्री ही महागली, यंदा असंख्या व्हरायटीज
- जान्हवी मोर्ये, भाग्यश्री प्रधान, ठाणे
मोदकांमध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या तांदळाचे पीठ, नारळ, गूळ, वेलची आदी पदार्थाचे दर वाढल्याने यंदा मोदक ही महागले आहेत. या किंमती मागील वर्षीच्या तुलनेत एका नगामागे सहा ते सात रूपयांनी वधारले आहेत. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मोदकांचे बुकींग कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. तसेच नामांकित मिठाई विकेत्यांकडे माव्याबरोबरच अनेक प्रकारचे मोदक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
चार्तुमासापासून नारळाचे दर शिगेला पोहोचले आहेत. दिवसागणिक त्यात वाढ झाली असून आज नारळाचे दर आकारानुसार २० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यत आहेत. सणांमुळे नारळाची वाढती मागणी आणि वाहतूक खर्च महागल्याने नारळ भाव वाढले आहेत.
मोदकांसाठी वापरण्यात येणारे सुवासिक बासमती पीठ हे बासमती तांदळांच्या कणीपासून बनविले जातात. ही कणी ४६ रूपये किलोने बाजारात मिळते. त्यामुळे ६० ते ८० रूपये किलो पीठ उपलब्ध आहे. गूळ ५६ रूपये किलो, रवा ४० रूपये किलो , साखर ३२ रू पये, साजूक तूप ४०० रूपये किलो, वेलची १६ रू. तोळा, खसखस १४ रूपये तोळा या दराने उपलब्ध आहेत. याचाच परिणाम बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांवर झाला आहे. १४ रूपयांना मिळणारा उकडीचा एक मोदक यंदा १८ ते २० रूपयांला मिळत आहे. तळलेले मोदक पाव किलो ६० ते ७० रूपयांना आहे. गणेशोत्सवात उकडीचे व तळलेले मोदकांना जास्त मागणी असते. गणेश चतुर्थीला बाप्पाला कोकणात उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर खान्देशात तळलेले मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यातही खवा, पुरण, कलाकंद, नारळाचा हलवा असे विविध सारण वापरले जाते.
(अधिक वृत्त पान २ वर )
- नारळाचे दर आकारानुसार २० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यत
- १४ रूपयांना मिळणारा उकडीचा एक मोदक यंदा १८ ते २० रूपयांला
- तळलेले मोदक पाव किलो ६० ते ७० रूपयांना