मोबाइल चोरट्यास मुंबईतून अटक : ४९ हजारांचे तीन मोबाईल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 19:06 IST2017-07-18T19:06:53+5:302017-07-18T19:06:53+5:30
ठाण्यात मोबाइल चोरी करुन मुंबईत पसार झालेल्या पुनितकुमार पांडे (२४, रा. मोहिली, साकीनाका, मुंबई) याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे

मोबाइल चोरट्यास मुंबईतून अटक : ४९ हजारांचे तीन मोबाईल हस्तगत
आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 18 : ठाण्यात मोबाइल चोरी करुन मुंबईत पसार झालेल्या पुनितकुमार पांडे (२४, रा. मोहिली, साकीनाका, मुंबई) याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४४ हजार ४९७ रुपयांचे तीन मोबाईल जप्त केले आहेत. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पाचपाखाडीतील रहिवाशी राजेश पवार यांच्या ‘विवियाना मॉल’ येथील दुकानातून १९ ते २२ जून रोजी दरम्यान वेगवेगळया नामांकित कंपन्यांचे दोन लाख ५५ हजार ८७८ रुपयांचे सहा मोबाईल त्याने चोरले. याप्रकरणी त्यांनी २९ जून रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव, पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि संदीप भोसले यांच्या पथकाने पांडेला १६ जुलै रोजी मुंबईतून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून सहापैकी तीन मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याला सुरुवातीला एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. मंगळवारी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.