रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले बांधकाम मनसेने पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST2021-07-21T04:26:45+5:302021-07-21T04:26:45+5:30

भिवंडी : भिवंडी-कल्याण-शीळ हा राज्य महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नव्याने तयार होत आहे. या सहा पदरी ...

MNS demolishes ongoing road construction | रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले बांधकाम मनसेने पाडले बंद

रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले बांधकाम मनसेने पाडले बंद

भिवंडी : भिवंडी-कल्याण-शीळ हा राज्य महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नव्याने तयार होत आहे. या सहा पदरी सिमेंट-काँक्रीट रस्त्याच्या सदोष बांधणी व निकृष्ट दर्जाच्या काँक्रीटीकरणाबाबत या रस्ते विकासक मे.साकेत एसएमएस जेव्ही या ठेकेदाराविरुद्ध सातत्याने पुराव्यानिशी तक्रारी दिल्या होत्या. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता अनिरुद्ध बोर्डे व मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के हे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसून ते अप्रत्यक्षपणे ठेकेदाराला मदत करीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेचे विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी करून थांबविले.

या कंत्राटदारावर संबंधित अधिकारी मेहेरनजर करीत आहे. कंत्राटदाराने केलेल्या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामावर अधिकारी पांघरूण घालायचे काम करत असल्याचा आरोपदेखील यावेळी मनसेचे परेश चौधरी यांनी केला आहे. मनसेच्या पाहणीवेळी रस्त्याच्या काँक्रीटीकरण सुरू असताना त्याच रस्त्यावरील दुसऱ्या मार्गीकेत तर एक मीटर लांब तर अर्धा फूट खोलीचा खड्डा पडलेला मनसेचे चौधरी यांच्या निदर्शनास आले. या निकृष्ट कामाची तक्रार करत मनसेचे विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुकाध्यक्ष परेश चौधरी व उपतालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुनील देवरे, उत्तम चौधरी यांनी या ठेकेदाराचे काम बंद पाडले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन चौधरी यांनी या रस्त्याच्या काँक्रीटचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावे, अशी मागणी केली. जोपर्यंत भिवंडी-कल्याण-शिळ रस्त्याचे बांधकाम हे शासनाने दिलेल्या निविदेनुसार होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम बंदच ठेवण्यात येईल, असा दम परेश चौधरी यांनी यावेळी दिला.

Web Title: MNS demolishes ongoing road construction