उल्हासनगरात रस्त्याच्या दुरस्तीसाठी मनसे शिष्टमंडळाचे आयुक्त विकास ढाकणे यांना साकडे
By सदानंद नाईक | Updated: December 13, 2024 19:42 IST2024-12-13T19:41:30+5:302024-12-13T19:42:04+5:30
जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

उल्हासनगरात रस्त्याच्या दुरस्तीसाठी मनसे शिष्टमंडळाचे आयुक्त विकास ढाकणे यांना साकडे
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरस्ती करण्याची मागणी मनसे शिष्टमंडळाने आयुक्त विकास ढाकणे यांना केली. धूळयुक्त रस्त्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन वाहनकोंडीचा प्रश्नही निर्माण झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी आयुक्तांना दिली.
उल्हासनगरात शेकडो कोटींच्या निधीतून सुरु असलेल्या विकास योजना वादात सापडून खोदलेल्या रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशी तक्रार राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरातील आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर व सुलभा गायकवाड यांनी आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. मनसेच्या शिष्टमंडळाने आमदारांचा कित्ता गिरवत आयुक्त ढाकणे यांची भेट घेऊन, रस्त्याच्या दुरास्थे बाबत माहिती देत रस्ता दुरस्तीची मागणी केली. तसेच रस्ता दुरस्तीला विलंब झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्त ढाकणे यांनी दिला.
शहरातील रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी आयुक्तानी ४ कोटीच्या निधीला मंजुरी दिली असून प्रभाग समिती कार्यालयाला प्रत्येकी एक कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आयुक्तानी दिली. तसेच भुयारी गटार योजनेच्या नावाखाली सर्वत्र रस्ते खोदण्यात येत नसून त्या कामा मध्ये सुसूत्रता नसल्याने रस्त्याची दुरावस्था झाली. खोदलेले रस्ते वेळीच दुरस्ती केले जात नसल्याने, माती व धूळ रस्त्यावर साचली. वाढत्या वाहणामुळे धूळ सर्वत्र उडून श्वसनाचा त्रास, दमा, सर्दी, खोकला आदीचे रुग्ण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. तसेच वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली. मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्ताना रस्त्यासाठी साकडे घालून रस्ते दुरस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.