ठाणे: शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेने पुन्हा एकदा आंदोलन छेडले. मंगळवारी दुपारी खड्ड्यांत स्लो मोटर सायकल स्पर्धा आयोजित करुन महापालिकेचा मनसेने निषेध नोंदविला. मनसे उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण व कोपरी प्रभाग अध्यक्ष पुंडलिक घाग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ठाणे स्टेशन रोड येथे स्लो मोटार सायकल स्पर्धा आयोजित केली होती. यात २५ जण सहभागी झाले होते. खड्ड्यांबरोबर रस्तेही खराब असल्याचा आरोप करीत खड्डे बुजवलेच पाहिजे, महापालिकेचा निषेध अशा घोषणा यावेळी दिल्या. आंदोलनाला उपशहर अद्यक्ष महिला सेनेच्या समीक्षा मार्कंडे, महिला सेनेच्या शहर अद्यक्षा रोहिणी निंबाळकर, उपविभाग अध्यक्ष सुनील नाईक. शाखा अध्यक्ष भुपेंद्र कोळी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे कठिण झाले आहे. अपघाताच्या घटनाही घडत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शुक्रवारी शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन केले होते. वेळेत हे खड्डे बुजवले गेले नाही, तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच या खड्ड्यांत टाकू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला होता. दरम्यान, पोलिसांनी १४ पदाधिकाºयांना ताब्यात घेऊन सोडले होते. या खड्ड्यांच्या समस्येप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी रविवारी देखील मनसेने शाखा अध्यक्ष हेमंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. आझादनगर येथील कोलशेत रोडवर जाणाऱ्या रस्त्यावर मनसेने खड्डा बूजवून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
खड्ड्याच्या निषेधार्थ ठाण्यात मनसेने पुन्हा छेडले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:26 IST
शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेने पुन्हा आंदोलन छेडले.
खड्ड्याच्या निषेधार्थ ठाण्यात मनसेने पुन्हा छेडले आंदोलन
ठळक मुद्देखड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेने पुन्हा छेडले आंदोलन स्लो मोटर सायकल आंदोलन स्पर्धा खड्ड्यांबरोबर रस्तेही खराब - मनसे