वर्गखोल्यांच्या कामात गैरव्यवहार; ११५० खोल्यांवर ३९ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 01:29 AM2020-05-29T01:29:36+5:302020-05-29T01:30:00+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीसाठी पत्र

 Misconduct in classroom work; 39 crore expenditure on 1150 rooms | वर्गखोल्यांच्या कामात गैरव्यवहार; ११५० खोल्यांवर ३९ कोटी खर्च

वर्गखोल्यांच्या कामात गैरव्यवहार; ११५० खोल्यांवर ३९ कोटी खर्च

Next

- हितेन नाईक 

पालघर : पालघर जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या नावाखाली आठ तालुक्यांत २०१५ ते २०२० दरम्यान एक हजार १५० वर्गखोल्यांवर ३९ कोटी ५२ लाख नऊ हजार ३५८ रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून त्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी यांनी करावा, असे पत्र देण्यात आले आहे. अत्यंत बोगस पद्धतीने ही कामे करण्यात आली असून या प्रकरणात काही माजी जिल्हा परिषद पदाधिकारी, अभियंते, ठेकेदार यांची अभद्र युती झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, यासंदर्भात शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेची बैठक होणार आहे.

जिल्हा परिषदेची निर्मिती जिल्ह्याच्या विकासासाठी होण्याऐवजी मिळालेल्या निधीचा विनियोग विकासासाठी कमी आणि गैरव्यवहारासाठी जास्त झाल्याच्या अनेक बाबी उघड होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे आगार बनल्याचे चित्र अनुकंपा भरती घोटाळा, परिचर घोटाळा, आरोग्य विभागाचा निकृष्ट बारकोड खरेदी घोटाळा आदी घोटाळ्यांद्वारे सर्वांच्या समोर आले आहे.

शिक्षण विभाग म्हणजे शिक्षक बदलीच्या कामासाठी पैसे घेण्याचे कुरण बनल्याची बाब माजी शिक्षणाधिकारी देसले यांना लाचलुचपत विभागाने पैसे घेताना रंगेहाथ पकडल्याने समोर आली होती. त्यांच्या मूळ गावी असलेल्या घरात लाचलुचपत विभागाने घातलेल्या धाडीत लाखो रुपयांची रोख रक्कमही सापडली होती.

जिल्हा परिषदेचे २०१५ पासून अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे होते. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात अनेक घोटाळे झाले असताना आता नव्याने प्राथमिक शाळांच्या बांधकाम दुरुस्तीच्या नावाखाली ३९ कोटी ५२ लाख नऊ हजार ३५८ रुपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने चौकशी करण्याचा ठराव उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

शाळा दुरुस्तीच्या नावाखाली पत्रे बदलणे, खिडक्या व दरवाजे बदलणे आदी वरवरची कामे करून, रंगरंगोटी करून लाखो रुपयांची बोगस बिले काढल्याची धक्कादायक बाब नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे काही माजी जिल्हा परिषद पदाधिकारी, संबंधित अभियंते, विभागप्रमुख यांची निर्माण झालेली साखळी मोडून काढण्याचा संकल्प नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

२०१५-१६ अंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यांत दुरुस्तीच्या नावाखाली काढण्यात आलेल्या एकूण कामांतर्गत ४०३ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी ३४ लाख आठ हजार ८४२ एवढी रक्कम खर्च करण्यात आली. २०१६-१७ अंतर्गत २८४ कामांतर्गत ४४४ वर्गखोल्यांसाठी सात कोटी ३८ लाख २४ हजार ८०९ रुपये, २०१७-१८ अंतर्गत २५६ कामांतर्गत आठ कोटी २३ लाख ४७ हजार ६२७ रुपये, २०१८-१९ अंतर्गत २४१ कामांतर्गत आठ कोटी ६८ लाख ४० हजार २२५ रुपये, तर २०१९-२० मध्ये १६९ कामांतर्गत नऊ कोटी १८ लाख ४७ हजार ८५५ रुपये असा एकूण ३९ कोटी ५२ लाख नऊ हजार ३५८ हजारांचा खर्च झाला आहे. त्यांनी आठही तालुक्यांत झालेल्या या शाळा व वर्गखोल्या दुरुस्तीच्या कामांची तपासणी केली. या शाळांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही त्या आजही गळत आहेत.

दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांतून उभ्या निधीचा असा दुरुपयोग होत आहे. दरम्यान, यासंदर्भात माजी जि.प. उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्याशी अनेक वेळा संपर्क करून टेक्स्ट मेसेजही केला, मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

शाळा दुरुस्ती, मैदान सपाटीकरण व शिक्षक बदली यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचे शिक्षण समिती सदस्यांकडून कळल्यावर काही बाबी तपासल्यावर त्यात तथ्यता असल्याचे दिसून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असा ठराव घेण्यात आला आहे.
- निलेश सांबरे,
उपाध्यक्ष, जि.प. पालघर

Web Title:  Misconduct in classroom work; 39 crore expenditure on 1150 rooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा