मीरारोड : घरातील गणपती बाप्पाचे दागिने लुटून मुलगा पसार
By धीरज परब | Updated: September 9, 2022 00:31 IST2022-09-09T00:29:14+5:302022-09-09T00:31:57+5:30
गणपती बसल्या पासून मुलगा घरी ये जा करत होता.

मीरारोड : घरातील गणपती बाप्पाचे दागिने लुटून मुलगा पसार
मीरारोड - घरी बसवलेल्या गणपती बाप्पाच्या गळ्यातील सोन्याचा हार लुटून मुलगा पळून गेल्या प्रकरणी त्याच्या आईनेच मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवला आहे. ६४ वर्षीय मालन इंगवले यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ९ मध्ये त्या पती शंकर (६८) व मुलगी दीपाली (४०) यांच्यासह राहतात. त्यांचा मुलगा विशाल (३९) हा पेणकरपाडा येथे राहतो.
इंगवले यांच्या घरी गणपती बसल्या पासून विशाल देखील घरी ये जा करत होता. ४ सप्टेंबर रोजी विशाल हा घरीच असल्याने त्याला जेवण वाढून मालन ह्या बहीण उषा शिंदे सह मैत्रिणी कडे गेल्या होत्या . तर पती शंकर हे झोपले होते. साडेतीनच्या सुमारास मालन ह्या घरी परतल्या असता विशाल निघून गेला होता.
गणपतीच्या गळ्यातील सोन्याचा हार त्यांना दिसून आला नाही. घरात सर्वत्र शोधून सुद्धा हार सापडला नाही. विशाल याला कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद होता. गणपती बाप्पाच्या गळ्यातील सोन्याचा ९५ हजार रुपयांचा हार मुलगा विशाल यानेच चोरून नेल्याची खात्री झाल्याने आई मालन यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.