लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- पालघरच्या सूर्या धरणाचे पाणी मीरा भाईंदरकरांना नोव्हेम्बर पासून २४ तास मिळेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाणे शहरातील पाणी टंचाई पाहता सूर्याचे अतिरिक्त पाणी ठाणे शहराला देण्याची मागणी करतानाच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा मंत्री सरनाईक यांनी बुधवारी पालघर येथील पाहणी दरम्यान घेतला. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक सह एमएमआरडीए व सूर्या योजने सह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सूर्या धरणातून वसई विरार महापालिकेला १७० दशलक्ष तर पालघर जिल्ह्यातील ४४ गावांना सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. मीरा भाईंदर शहरासाठी २१८ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असले तरी गेली काही वर्ष रेंगाळलेल्या या प्रकल्पामुळे मीरा भाईंदरकरांना सूर्याचे पाणी मिळू शकलेले नाही.
सूर्या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आलो असून आता राज्याचा मंत्री या नात्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे लवकर हा प्रकल्प पूर्ण करून मीरा भाईंदर वासीयांना २४ तास शुध्द पाणी पुरवठा करण्यायास आपले प्राधान्य आहे. पाठपुरावा केल्याने या योजनेचे तांत्रिक काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम येत्या ६ महिन्यात पूर्ण होईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
वसई काशिद कोपर ते चेणे जलकुंभापर्यंत सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम ,वसई खाडी छेदून मायक्रो टनेलिंग द्वारे जलवाहिनी टाकण्याचे काम, कवडास येथील १३२ केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम, चेणे वनविभागाच्या हद्दीतील जलवाहिनि व खासगी जागेतील पुलाचे काम ,जलकुभांचे काम या सर्व रखडलेल्या कामाचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला. सूर्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख चालले असून या बाबत पुढील महिन्यात मंत्रालयात बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.