मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
By धीरज परब | Updated: December 20, 2025 21:39 IST2025-12-20T21:39:01+5:302025-12-20T21:39:28+5:30
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana: जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसेच इतर प्रश्नही सोडवणार असल्याचीही दिली ग्वाही

मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana: लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आपण सोडवला. आता शहरातील ओसी न मिळालेल्या शेकडो इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईच्या योजनेप्रमाणे योजना आणणार. हक्काच्या घरापासून कोणी वंचित राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरारोड येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात सांगितले. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री बनतो, तेव्हा त्याला माहिती असते की आई महिना कशी चालवायची. त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला, जी गेमचेंजर ठरली. लाडक्या बहिणींना लखपती करायचे आहे.
शनिवारी सायंकाळी शिंदेसेनेचा निर्धार मेळावा मीरारोडच्या शिवार उद्यान भागात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अडीच वर्षांच्या आपल्या मुख्यमंत्री काळात राज्याला पुढे घेऊन गेलो. मेट्रोला चालना, सी लिंक आदी अनेक विकासाची कामे केली. टोल हटवला, महिला व मुलींसाठी, शेतकऱ्यासांठी योजना केल्या. सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना होती. विरोधकांनी योजना बंद करण्याचे प्रयत्न केले पण आपण ती बंद होऊ दिली नाही. मी पण गरिबी बघितली आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री बनतो तेव्हा त्याला माहिती असते कि आई महिना कशी चालवायची. त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला, जी गेमचेंजर ठरली. लाडक्या बहिणींना लखपती करायचे आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरला देशाच्या नकाशावर आणले. त्यांनी शहरात परिवर्तन घडवले. मंत्रिपद मिळाल्या नंतर ते राज्यात मोठे काम करत आहेत. पुढील महिन्यात मेट्रो धावेल. त्याखाली उड्डाणपूल बनवले. सर्व रस्ते काँक्रीटचे होत आहेत. ६ महिन्यात सूर्य योजनेचे पाणी नागरिकांना मिळेल. बाळासाहेब ठाकरे कलादालन साकारले. ४०० खाटांचे रुग्णालय होत आहे. सर्व समाजांना सोबत घेऊन समाजभवन बनवली. जी३० टक्के बाकी आहेत त्यासाठी लागेल तो निधी देऊ. पुढील ५० वर्षांचे व्हिजन ठेऊन शहराचा मेकओव्हर करण्याचे काम मंत्री सरनाईक यांनी केले.
मीरा भाईंदरमध्ये देश सामावला आहे. नागरिकांना जे हवे ते देण्याचे काम शिवसेना करेल. सर्व जाती धर्मियांचे रक्षण करण्याचा आमचा धर्म आहे असे. बाळासाहेबांचा वारसा सांगणारे त्यांचे विचार विसरले पण आपण बाळासाहेबांचे विचार पुढे नेला म्हणून ८० पैकी ६० जागा विधानसभेत आपण जिंकलो. मुख्यमंत्री असताना विरोधकांना जोर का झटका धीरेसे दिला होता. पण आता जोरका झटका जोरसे देणार. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे हवे.
आम्हाला शहराचा विकास हवा आहे. बाळासाहेब म्हणायचे कि मुंबई, ठाण्यात भगवा आहे तसा मीरा भाईंदर मध्ये पण भगवा हवा. विधानसभेत युती झाली तशीच महापालिका निवडणुकीत युती झाली पाहिजे. देशभक्ती आणि विकासाची आमची विचारधारा आहे. स्थानिक पातळीवर त्रास असेल तर तो दूर होईल. मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युती बाबत बोलू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले कि, पूर्वीच्या आणि आजच्या मीरा भाईंदर मधील विकासाचा जो जमीन आस्मानचा फरक झाला तो फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळे. घोडबंदर किल्ला सौंदर्यीकरण, लता मंगेशकर नाट्यगृह, शहीद ज्योत आदी अनेक विकासकामे झाली. जेव्हा पालिकेत एकाचे राज्य होते तेव्हा त्याने बाळासाहेब ठाकरे कलादालनला विरोध केला. आज तीच व्यक्ती स्वतःच्या पत्रकात कलादालन मी बनवले म्हणून लोकांना सांगतोय. त्यांना लाज शरम पण नाही अशी बोचरी टीका भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचे नाव न घेता केला. आज शहरात शिवसेनेची ताकद मोठी वाढलेली आहे. महायुती व्हायला हवी, पण स्थानिक नेता घमंडी झाला असून त्याला शहर म्हणजे तोच असे वाटत असल्याची टीका मंत्री सरनाईक यांनी केली.