ठाणे: एका १७ वर्षीय मुलीवर तिच्याच १७ वर्षीय मित्राने लैंगिक अत्याचार केल्यानंतर आपण गराेदर राहिल्याचा तिचा समज झाला. त्याची जबादारी या मित्राने झटकल्यानंतर आलेल्या नैराश्यातून या पीडित मुलीने घरातच आत्महत्या केल्याची घटना कासारवडवलीतील घरात घडली. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर यातील अल्पवयीन मुलाविरुद्ध पाेक्साे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.कासारवडवली, ओवळा भागात राहणाऱ्या या पीडित मुलीचे काेलशेत भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाबराेबर मैत्रीचे संबंध हाेते. त्यांच्यात जवळीक वाढल्यानंतर त्याने महिनाभरापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यातूनच ती गराेदर राहिल्याचा तिचा समज झाला. आपण एक महिन्यांची गराेदर असल्याचे तिने या मुलाला सांगितले. मात्र, आपण काेणतीही जबाबदारी घेणार नसल्याचे सांगत ताे मित्र पसार झाला. तिने त्याचा शाेध घेतला. मात्र, ताे कुठेच न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या या मुलीने ८ फेब्रुवारी २०२५ राेजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली. अल्पवयीन मुलाविरुद्ध पाेक्साेअंतर्गत तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याला १२ फेब्रुवारीला सहायक पाेलिस निरीक्षक विजय शिरसाट यांच्या पथकाने ताब्यात घेतले. बाल न्यायालयाच्या आदेशाने त्याची भिवंडीतील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
मित्राने जबाबदारी झटकताच अल्पवयीन मुलीची आत्महत्या, अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात; गुन्हा दाखल
By जितेंद्र कालेकर | Updated: February 12, 2025 23:05 IST