ठोकपगारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन
By Admin | Updated: March 23, 2017 01:22 IST2017-03-23T01:22:06+5:302017-03-23T01:22:06+5:30
केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ठोकपगारी म्हणून कार्यरत असलेल्या १०५ वाहनचालकांना किमान वेतनाप्रमाणे

ठोकपगारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन
कल्याण : केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ठोकपगारी म्हणून कार्यरत असलेल्या १०५ वाहनचालकांना किमान वेतनाप्रमाणे १६ हजार २०० रुपये वेतन अदा करण्याबाबत मांडलेल्या उपसूचनेला बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी हिरवा कंदील दाखवला. दरम्यान, या उपसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, असे आदेश सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.
घनकचरा व्यवस्थापन विभागात ७५ कायमस्वरूपी तर १०५ ठोकपगारी वाहनचालक आहेत. आता नव्याने घनकचरा तसेच अन्य विभागासाठी कंत्राटी पद्धतीने वाहनचालक घेण्यात येणार आहेत. प्रत्येक वाहनचालकाला १७ हजार १०० रुपये वेतन अदा केले जाणार आहे. प्रशासनाकडून दाखल केलेल्या या प्रस्तावाला बुधवारच्या सभेत मान्यता देण्यात आली.
दरम्यान, मागील चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या ठोकपगारी कर्मचाऱ्यांना केवळ १० हजार वेतन मिळते. जर कंत्राटी वाहनचालकांना १७ हजार १०० रुपये अदा केले जाणार असतील तर ठोकपगारी वाहनचालकांनाही किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक व म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन व महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार, बुधवारच्या स्थायीच्या सभेत शिवसेनेचे सदस्य मोहन उगले यांनी संबंधित उपसूचना मांडली होती. त्याला सभागृहनेते व सदस्य राजेश मोरे यांचे अनुमोदन लाभले.सर्व वाहनचालकांना किमान वेतन मिळावे, यासाठी ठोकपगारी वाहनचालकांनाही वेतन मिळावे, या उपसूचनेला सर्वपक्षीय सदस्यांनी मान्यता दिली.
कंत्राटी वाहनचालकांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, संबंधित वाहनचालक घनकचरा व्यवस्थापन विभागासाठीच वापरण्यात यावेत, अशा सूचनाही सदस्यांच्या वतीने करण्यात आल्या. (प्रतिनिधी)