भिवंडीतही एमआयएमचा उमेदवार
By Admin | Updated: April 25, 2017 00:00 IST2017-04-25T00:00:27+5:302017-04-25T00:00:27+5:30
मुंबई, ठाणे व कल्याणपाठोपाठ एमआयएम पक्ष आता भिवंडीतही आपले नशीब आजमावणार आहे. पक्षाच्या मुख्य कमिटीने भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

भिवंडीतही एमआयएमचा उमेदवार
भिवंडी : मुंबई, ठाणे व कल्याणपाठोपाठ एमआयएम पक्ष आता भिवंडीतही आपले नशीब आजमावणार आहे. पक्षाच्या मुख्य कमिटीने भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
आॅल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुसलमीन म्हणजेच एमआयएम प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक लढवत असून त्यानिमित्ताने २० दिवसांपूर्वी अशोका हॉटेल व रविवारी रिजंट हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग आयोजिली होती. काही दिवसांपूर्वी एमआयएमची संपूर्ण शहर कार्यकारिणी समाजवादी पार्टीत विलीन झाली होती. त्यामुळे राज्यातील पक्ष नेत्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी धसका घेतला होता. मात्र, पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबई विभागातील कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकल्याने पक्षउभारणीस गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. रविवारी झालेल्या बैठकीत मुंब्रा शहराध्यक्ष रौफ लाला, नगरसेवक गुंजन बरकतुल्ला खान, केडीएमसीचे नगरसेवक अय्याज मौलवी, शादाब उस्मानी, अबरार खान, अॅड. सुकी
शेख, रमेश आन्ना यांची निवडणुकीसाठी मुख्य कमिटी जाहीर करण्यात आली.
शहरातील निवडणुकीसंदर्भात होणारे निर्णय ही कमिटी घेणार असून येत्या शनिवारी पक्षाध्यक्ष ओवेसी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती कमिटी सदस्य शादाब उस्मानी यांनी दिली. वास्तविक, एमआयएमने मुंबईत २, मुंब्रा २ व केडीएमसीमध्ये २ नगरसेवक निवडून आणले होते. तर, राज्यात एमआयएमचे १३५ नगरसेवक विविध नगरपालिका व महानगरपालिकेत आहेत. निवडणुकीत पक्षामार्फत उमेदवारी मिळवण्यासाठी लोक येत आहेत. परंतु, इतर मनपाप्रमाणे जेथे मुस्लिम व दलित वस्ती आहे, तेथे उमेदवारांना प्राधान्य देणार आहे. तसेच जागादेखील कमी लढवणार आहेत. निवडणुकीची रणनीती मुख्य कार्यकारिणीने तयार केली असून त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)