लक्षावधी गोरगरीब उपाशी
By Admin | Updated: November 12, 2016 06:32 IST2016-11-12T06:32:58+5:302016-11-12T06:32:58+5:30
बड्या नोटा रद्द झाल्यामुळे हातावर पोट असलेले बांधकाम मजूर, सफाई कामगार, नाका कामगार यांच्यावर अक्षरश: उपासमारीचे संकट कोसळले आहे.

लक्षावधी गोरगरीब उपाशी
ठाणे : बड्या नोटा रद्द झाल्यामुळे हातावर पोट असलेले बांधकाम मजूर, सफाई कामगार, नाका कामगार यांच्यावर अक्षरश: उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यांच्याकडील ५०० रुपयांच्या नोटा कुणी घेत नाही आणि ही नोट कुठे व कशी मोडायची, असा पेच पडल्याने काहींनी दोन दिवस चक्क उपाशी राहण्याचा मार्ग पत्करला आहे.
बांधकाम मजूर किंवा तत्सम हातावर पोट असलेल्या परप्रांतीय कामगारांना दिवसाकाठी मजुरी मिळते. ही मजुरी देणारे कंत्राटदार बऱ्याचदा दोनचार दिवसांच्या मजुरीकरिता पाचशे-हजाराच्या नोटा देतात. गेले दोन दिवस हे कामगार या नोटा कुणी स्वीकारत नसल्याने हैराण झाले आहेत. भाषा समजत नाही, वृत्तपत्र व सोशल मीडियाचा दुरान्वये संबंध नाही आणि बँकेत खाते नाही, तर डेबिट-क्रेडिटकार्डांचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा या कामगारांकडून आतापर्यंत सहजपणे घेतल्या जाणाऱ्या नोटा आता का स्वीकारल्या जात नाहीत, हे समजण्यातच त्यांचा एक दिवस गेला. त्यानंतर, कामावर जायचे की, बँकेच्या रांगेत उभे राहायचे, या पेचात ते सापडले. अनेकांची कुठल्याही बँकेत खाती नसल्याने आपल्याला तेथे तरी हे पैसे सुटे करून मिळणार किंवा कसे, अशी शंका असल्याने हातावर पोट असलेल्या अनेकांना गेले दोनतीन दिवस धड जेवण मिळालेले नाही.
आर्किटेक्ट व बांधकाम कंत्राटदार दिलीप देशमुख म्हणाले की, माझ्याकडे आंध्र प्रदेशातील बांधकाम मजूर काम करतात. मी त्यांना मजुरी देतो. मात्र, सध्या त्यांच्या नोटा कुणी घेत नसल्याने ते गेले दोन दिवस उपाशी आहेत. त्यांची दया आल्याने त्यांना खाऊ घालण्यासाठी बँकेतून पैसे काढायला मी गेलो, तर बँक मला चार हजार रुपयेही देत नाही. समजा, बँकेने मला चार हजार रुपये दिले, तरी मी कुणाकुणाची देणी भागवू की, कामगारांना खायला घालू. त्यामुळे ज्यांनी आयकरापासून व्हॅटपर्यंत सर्व करांचा नियमित भरणा केला आहे, त्यांना तरी वेगळ्या रांगेत उभे करून त्यांच्या गरजेनुसार बँकांनी पैसे उपलब्ध करून दिले पाहिजेत, अशी मागणी देशमुख यांनी केली.