खुनाचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:46 IST2018-12-11T22:46:35+5:302018-12-11T22:46:51+5:30

सहा जणांना अटक; १५ डिसेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

The militant group trying to murder | खुनाचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

खुनाचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

ठाणे: गाडी चालकाला लुटण्यासाठी डोक्यात गोळी घालून त्याची हत्या करणाऱ्या बंटी उर्फ जयसिंग ठाकूर याच्यासह सहा जणांच्या सशस्त्र टोळीला नारपोली पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. खंडणी आणि लुटीसाठी त्यांनी खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचेही उघड झाल्याचे ठाण्याच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सोमवारी सांगितले.

ठाणे आणि भिवंडीतील नारपोली भागातील बांधकाम व्यवसायिक तसेच बड्या आसामींकडून खंडणी वसूलीच्या तयारीमध्ये ही टोळी होती. एका खुनी हल्ल्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांच्या पथकाने दुलाल मंडल (२९, रा. हायलॅन्ड हेवन, ठाणे, मूळ राहणार पश्चिम बंगाल) याला अलिकडेच अटक केली होती. त्याच्या अंगझडतीमध्ये एक पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे हस्तगत केली. याच तपासातून पुढे ठाणे ग्रामीणमधील शहापूर परिसरातील एका खुनाचाही छडा लागला. यामध्ये दलाल तसेच त्याचे अन्य साथीदार हिर उर्फ हिरामण गंगावासी (४०, रा. सिव्हील हॉस्पीटल वसाहत, ठाणे), काली उर्फ प्रमोद नुनेर (३०, रा. गांधीनगर, ठाणे), रॉय उर्फ राजेश करोतिया (३०) आणि अंजू उर्फ प्रभाकर सिंग (३०) यांना अटक केली. त्यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

एका वाहन विक्रीतील कमिशनवरुन अर्जून सरकार (३२) याच्या खुनाचा प्रयत्न त्याच्या नातेवाईकाने कशेळी पाईपलाईन येथे केला होता. याप्रकरणी ६ डिसेंबर २०१८ रोजी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. याच गुन्ह्याच्या चौकशीमध्ये दुलाल मंडल याला ७ डिसेंबर रोजी तर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ८ डिसेंबर रोजी यातील मुख्य सूत्रधार बंटी उर्फ जयसिंग ठाकूर याला अटक करण्यात आली. बंटी ठाकूर, दुलाल मंडल आणि अंजू उर्फ प्रभाकर ठाकूर यांनी २३ नोव्हेंबर २०१८ रोजी माजीवडा येथून भाड्याने एक कार घेतली. पुढे कसारा घाटानंतर चांदा गावाजवळ, शहापूर परिसरात अरविंद दीक्षित या चालकाकडून गाडी घेण्यासाठी जयसिंगने डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला. याप्रकरणी शहापूर पोलिसांकडूनही तपास सुरु आहे. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्हयात ९ डिसेंबर रोजी या टोळीला अटक केल्यानंतर चौकशीत या टोळीला चालकाच्या खून प्रकरणात १० डिसेंबर रोजी अटक केली.

आरोपींच्या घरातून पिस्टल, काडतुसे जप्त
अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी हिरू ऊ र्फ हिरामण याच्या घरातून एक पिस्टल, दहा जिवंत काडतुसे, तीन चॉपर आणि एक सुरी तर रॉय याच्या घरातून एक पिस्टल, दहा जिवंत काडतुसे असे चार पिस्टल, ३१ जिवंत काडतुसे, कार, चोरीच्या दोन मोटरसायकली, तीन चॉपर, एक सुरी आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. याप्रकरणी आरोपींचीही कसून चौकशी सुरू असून आणखी काही उलगडा करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

Web Title: The militant group trying to murder