पावसाळ्यात होते नाट्यगृहात स्थलांतर
By Admin | Updated: August 15, 2015 23:11 IST2015-08-15T23:11:48+5:302015-08-15T23:11:48+5:30
शहरातील दुसरे पोलीस ठाणे म्हणून निजामपूर पोलीस ठाण्याची ओळख असून गेल्या १५ वर्षांत महानगरपालिकेस मार्केट बांधता न आल्याने भाजी विक्रेत्यांनी निजामपूर पोलीस ठाण्याला वेढा घातला आहे.

पावसाळ्यात होते नाट्यगृहात स्थलांतर
- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
शहरातील दुसरे पोलीस ठाणे म्हणून निजामपूर पोलीस ठाण्याची ओळख असून गेल्या १५ वर्षांत महानगरपालिकेस मार्केट बांधता न आल्याने भाजी विक्रेत्यांनी निजामपूर पोलीस ठाण्याला वेढा घातला आहे.
निजामपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोणतीही घटना घडली तर पोलिसांना प्रथम रस्त्यावर बाजार मांडलेल्या भाजी विक्रेत्यांचा सामना करून त्यामधून वाट काढून घटनास्थळी जावे लागते. मनपाच्या जकात केबिनमध्ये प्रथम पोलीस चौकी झाली, नंतर निजामपूर पोलीस ठाणे अस्तित्वात आले. शासनाकडून या जागेचे भाडे पालिकेस मिळत होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेने ते वसूल केलेले नाही. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाल्यानंतर गरजेप्रमाणे लोकवर्गणीतून या पोलीस ठाण्याच्या वास्तूत बदल झाले आहेत. तरीदेखील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. तसेच दरवर्षी पावसाचे पाणी पोलीस ठाण्यात शिरल्याने भिंती व फर्निचर खराब होते.
तसेच पाणी वाढल्याची चाहूल लागताच कर्मचारी पोलीस ठाण्यातील सर्व सामान जवळच असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये नेऊन तेथे तात्पुरते पोलीस ठाणे सुरू करतात. पाणी ओसरेपर्यंत तेथूनच कारभार चालतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होतात. ही कसरत दरवर्षी करावी लागत असल्याने शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोटरगेट मशिदीसमोरील जागेत नव्याने पोलीस ठाणे बांधण्यास घेतले होते. तेव्हा परिसरातील लोकांनी त्यास विरोध केला आणि पोलीस ठाण्याचे काम अर्धवट स्थितीत राहिले. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या अपुऱ्या जागेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन काम करावे लागत आहे. या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शहर व ग्रामीण भाग येत असून वाढत्या लोकसंख्येमुळे पोलिसांची जबाबदारी वाढत आहे.
पोलीस ठाण्याची इमारत ही मोठी समस्या सर्व कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार निजामपूर पोलीस ठाण्याच्या जागेवर नवीन बांधकाम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर मनपाच्या मार्केटची मोठी जागा आहे. त्या जागेत नवीन इमारत बांधून हे पोलीस ठाणे तेथे हलविण्याचा विचार पुढे येत आहे. या इमारतीस शासन व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते.
पोलीस ठाण्याच्या तिन्ही बाजूंना असलेल्या रस्त्यांवरील भाजी मार्केटमुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य आहे. त्याचा उग्र वास, मच्छरांची पैदास याने कर्मचारी व अधिकारी नेहमी आजारी पडतात. पालिकेने रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना मंडई बांधून दिल्यास रस्त्यावरील घाणीबरोबरत्यांचे अडथळे दूर होऊन पोलिसांना घटनास्थळी लवकर जाणे शक्य होणार आहे. महानगरपालिका या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पालिकांतर्गत वादविवाद व मोर्चे, आंदोलनासाठी बंदोबस्त करावा लागतो. अचानक घटना घडल्यावर सर्व कामे बाजूला सारून पालिका इमारतीत धाव घ्यावी लागते.
शासनाने महानगरपालिकेस स्वत:चे पोलीस ठाणे स्थापन करून त्याचे नियंत्रण स्थानिक पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यास सांगितले होते. परंतु, याबाबत पालिका कोणतीही हालचाल करण्यास तयार नाही. हे स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे प्रकटीकरणास वेळ देता येणार आहे. तसेच एसटी स्थानकातील भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रवाशांच्या जमावावर अजूनही लक्ष द्यावे लागते.