ठामपाकडून म्हाडाची १४ कोटींची कोरोनासामग्री लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:58+5:302021-04-03T04:36:58+5:30

ठाणे : कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक ...

MHADA's 14 crore corona material lamps from Thampa | ठामपाकडून म्हाडाची १४ कोटींची कोरोनासामग्री लंपास

ठामपाकडून म्हाडाची १४ कोटींची कोरोनासामग्री लंपास

ठाणे : कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर म्हाडाने कौसा येथे अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक साहित्य लावले होते. ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी हे तब्बल १२ ते १४ कोटींचे साहित्य लंपास केले असून त्यांनी जर ते जसे होते, त्या स्थितीत ४८ तासांत पुन्हा ठेवले नाही, तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दिला. मंत्र्यांनीच ठामपावर चोरीचा आरोप केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर आव्हाड यांच्या आदेशानुसार कौसा येथे म्हाडाने अद्ययावत अशा कोविड रुग्णालयाची उभारणी केली होती. मात्र, सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला होता. हाच फायदा घेऊन ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांनी सर्व साधने लंपास केली आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आव्हाड यांनी कौसा येथील रुग्णालयाची पाहणी केली असता, हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकारामुळे आव्हाड हे संतप्त झाले आहेत. गोरगरिबांसाठी उभी केलेली ही यंत्रणा उद्ध्वस्त करणा-या डॉ. मुरूडकर यांना निलंबित करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

कोरोनाचा कहर वाढल्याने आपण म्हाडाने उभ्या केलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलो असता, त्या ठिकाणी सर्व साधने अस्ताव्यस्त असल्याचे दिसले. सुरक्षारक्षकांकडे विचारणा केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांनी रुग्णालयातील सुमारे ९४ व्हेंटिलेटर्स आणि अन्य साहित्य लंपास केले आहे. म्हाडाच्या मालकीची ही आरोग्य साधने काढून नेताना पाइपलाइनदेखील तोडून टाकण्याचे काम त्यांनी केले आहे. ही साधने ठामपाच्या मालकीची नसतानाही ती नेऊन भाड्याने दिली आहेत. म्हाडाच्या मालकीची सुमारे १२ ते १४ कोटींची आरोग्य साधने अशा पद्धतीने लंपास का केली, असा सवाल करून अशा बेजबाबदार अधिका-याला तत्काळ निलंबित करावे. तसेच येत्या ४८ तासांमध्ये सर्व साधने पूर्वस्थितीत आणून सुरू न केल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

‘‘मुंब्रा येथील कौसा कोविड सेंटर डिसेंबर २०२० मध्ये बंद झाले होते. त्यामुळे तेथील साधनसामग्री ही तशीच पडून होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या परवानगीने या सामग्रीमधील ३० व्हेंटिलेटर ग्लोबल हॉस्पिटल आणि ६४ पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. ते लंपास केलेले नाहीत. यातील पार्किंग प्लाझाचे व्हेंटिलेटर्स परत केले असून ग्लोबलचेही परत केले जाणार आहे. म्हाडा अथवा गृहनिर्माणमंत्र्यांची परवानगी घेतली नाही. हीच चूक झाली.’

डॉ. राजू मुरूडकर, आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका

Web Title: MHADA's 14 crore corona material lamps from Thampa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.