डोंबिवली- जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या वतीने आज सकाळी वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानानिमित्त भव्य स्कूल व्हॅन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत ५० स्कूल बस सहभागी झाल्या होत्या. वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश रॅलीतून देण्यात आला.संस्थेच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते. निवासी विभागातील ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी रोडला असलेल्या महावितरण कार्यालयाजवळून या रॅलीला प्रारंभ झाला. आमचे शहर सायलेंट शहर, हॉर्न वाजविण्याचे दुष्परिणाम, हॉर्न न वाजविण्याचे फायदे, गोंगाट हे प्रदूषण आहे. प्रदूषण हा एकविसाव्या शतकातील अपराध आहे. हे पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती लक्षवेधी फलक देण्यात आले होते. हे फलक रॅलीचे प्रमुख आकर्षण होते. या रॅलीत डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख, नाशिकचे सह संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण उपशाखेचे पोलीस निरीक्षक गोविंदराव गंभीरे, संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.संस्थेच्या निवासी विभागातील कार्यालयापासून निघालेली रॅली घरडा सर्कलजवळ आली. या ठिकाणी त्यांनी कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रॅलीने शेलार चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर आणि टिळक चौकात असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ताई पिंगळे चौकातून टिळक रोड- फडके रोड मार्गे इंदिरा चौकात आली. तेथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रॅली मानपाडा रोडने शिवाजी उद्योग नगर येथून पुन्हा कार्यालयाच्या जवळ विसर्जित करण्यात आली. या रॅलीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
स्कूल व्हॅन रॅलीतून वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 20:52 IST