In a mess, the student was disfellowshipped, and denied national level sports standards | भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्याला फटका, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडागुणांपासून वंचित
भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्याला फटका, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडागुणांपासून वंचित

- जान्हवी मोर्ये

डोंबिवली - राष्ट्रीय स्तरावर रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधीश बारी या विद्यार्थ्याला सरकारी यंत्रणांमधील भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. त्याच्या क्रीडा प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रत तपासून त्या महाराष्ट्र रायफल असोसिएशनने (एमआरए) ठाण्याऐवजी पुण्याला पाठवल्याने अधीशला दहावीच्या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावरील गुणांपासून वंचित राहावे लागले आहे. ही सरकारी यंत्रणांची चूक दूर करून त्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

दत्तनगर परिसरात राहणारा अधीश चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात शिकत होता. चार वर्षांपासून तो रायफलचे प्रशिक्षण घेत असून दोन वर्षांपासून तो राष्टÑीय निवड चाचणीत प्रयत्न करत आहे. पेंढरकर महाविद्यालयातून तो रायफलचे प्रशिक्षण घेत आहे. अधीशचे वडील विनोद म्हणाले की, मार्चपर्यंत शाळेकडे प्रमाणपत्रे जमा करण्याची मुदत होती. शाळेने ही प्रमाणपत्रे डिस्ट्रिक्ट स्पोटर््स आॅफिसरकडे (डीएसओ) पाठवली.

डीएसओकडे जिल्हास्तरीय खेळाडूंची यादी असते, त्यामुळे त्यांनी जिल्हास्तरीय कागदपत्रे ठेवून राष्ट्रीय पातळीवरील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती आणण्यास सांगितले. त्यानुसार, वरळी येथील एमआरएच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी ही कागदपत्रे आमच्याकडे न देता बोर्डाला पाठवतो, असे सांगितले. मात्र, त्यांनी ही कागदपत्रे ठाण्याला पाठवण्याऐवजी बालेवाडी (जि. पुणे) येथे पाठवली. त्यामुळे अधीशला जिल्हास्तरीय पाच क्रीडागुण मिळाले; पण राष्ट्रीय स्तरीय १० गुणांपासून तो वंचित राहिला.

अधीश आणि त्याच्या कुटुंबीयांनी आॅनलाइन निकाल पाहिल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी बोर्डाकडे धाव घेतली असता बोर्डाने आता निकाल लागला असून फाइल जमा असती, तर गुण देता आले असते. पण, आता बदल करता येणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. बोर्डाच्या मते, शाळांनी एक प्रत डीएसओला आणि एक प्रत बोर्डाला देणे अपेक्षित होते. पण, शाळांकडून प्रमाणपत्रांची प्रमाणित प्रत आल्याशिवाय ते प्रत स्वीकारत नसल्याचे सांगितले जात असल्याचे बारी यांनी सांगितले. एमआरए कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

डीएसओला कागदपत्रे पाठवल्यावर त्यांनी जिल्हास्तरीय कागदपत्रे ठेवून राष्ट्रीय पातळीवरील कागदपत्रे प्रमाणित नसल्याने ती काढून टाकली. एमआरएने ती कागदपत्रे वेळेत डीएसओकडे पाठवण्याची गरज होती. आमच्या शाळेतील इतर खेळाडूंना क्रीडागुण व्यवस्थित मिळाले आहेत. अधीशच्या बाबतीत हा घोळ झाला आहे.
- गुलाबराव पाटील, क्रीडाशिक्षक, चंद्रकांत पाटकर विद्यालय


Web Title: In a mess, the student was disfellowshipped, and denied national level sports standards
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.