पारा ४४ अंशांवर!
By Admin | Updated: March 28, 2017 06:01 IST2017-03-28T06:01:14+5:302017-03-28T06:01:14+5:30
यंदाचा उन्हाळा तीव्र असेल आणि सूर्य विषुववृत्तावर असल्याने तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच

पारा ४४ अंशांवर!
लोकमत टीम / ठाणे
यंदाचा उन्हाळा तीव्र असेल आणि सूर्य विषुववृत्तावर असल्याने तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच ठाणे जिल्ह्यात सोमवारी पारा ४४ अंशांवर पोहोचला आणि जनजीवन विस्कळीत झाले. उत्तरेकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे उष्णतेच्या लाटेत भर पडली आहे आणि ती अजून आठवडाभर कायम राहण्याची चिन्हे आहेत.
ठाणे जिल्ह्यात बदलापूर, भिवंडी आणि शहापूरमध्ये तापमान सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्याखालोखाल ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, भार्इंदर, उल्हासनगर आदी प्रमुख शहरांत ते ४३ अंशांवर गेले होते. दुपारी १२ ते ४ या चार तासांत तापमानाची तीव्रता वाढली होती. आठवडाभर ही तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस वातावरण काहीसे ढगाळ राहील. त्यामुळे तापमानात माफक घसरण होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान वाढत असतानाच वाऱ्याची मंद गती आणि हवेतील आर्द्रतेचे कमी झालेले प्रमाण यामुळे उन्हाच्या झळा अधिक जाणवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
काय काळजी घ्याल?
आवश्यकता नसेल तर दुपारच्या उन्हात शक्यतो बाहेर पडू नका.
स्कार्फ, सनकोट यांनी अंग झाकून घ्या. घाम शोषून घेतील, असे कॉटनचे (सुती) कपडे वापरा.
बाहेर पडण्यापूर्वी किमान दोन ग्लास पाणी पिऊनच बाहेर पडा.
कोल्ंिड्रकचा मोह टाळा. त्याऐवजी वाळायुक्त सरबत, ताक, पन्हे, शहाळ्याचे पाणी प्या. त्यात बर्फाचा वापर शक्यतो नको.
पाणी पितानाही माठातील प्या. फ्रीजमधील पाणी किंवा थेट बर्फाचे पाणी पिऊ नका. पाण्यात ग्लुकोन डी, इलेक्ट्रॉल पावडर घालावी किंवा साखर-मिठाच्या जलसंजीवनीचा वापर करावा.
उन्हातून आल्यावर लगेचच पाणी पिऊ नका किंवा थेट एसीत जाणे टाळा. मध्ये काही काळ जाऊ द्या.
उन्हात फिरल्यामुळे तापही आल्यास त्वरित रुग्णालयात न्यावे. तोवर, रु ग्णाच्या अंगावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या.
‘पशुपक्ष्यांची काळजी घ्या’
तलखीचा फटका पक्ष्यांनाही बसतो आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने उडणारे पक्षी अचानक कोसळण्याच्या घटना घडत आहेत. शिवाय, प्राणीही पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी ठेवावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
उन्हामुळे छत्र्या, गॉगल, टोप्या, स्कार्फ घातलेले नागरिक दिसत होते. ताक, पन्हे, शहाळ््याचे पाणी पिण्यास गर्दी झाली होती.
स्वागतयात्राही लवकर
सकाळी साडेआठ-नऊ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याने त्याचा परिणाम स्वागतयात्रांवरही होण्याची शक्यता आहे.
सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान या यात्रा सुरू होतात आणि सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांची मार्गक्रमणा सुरू असते.
पण, उन्हाच्या काहिलीमुळे यंदा स्वागतयात्रेच्या मार्गांवर पिण्याच्या पाण्याची, सरबत-ताकाची व्यवस्थाही केली जाणार आहे. शिवाय, यात्रा लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीनेही आयोजकांची आखणी सुरू आहे.