महापौरपदासाठी मीरा-भार्इंदरच्या इच्छुकांना लागली आस
By Admin | Updated: February 9, 2017 03:42 IST2017-02-09T03:42:59+5:302017-02-09T03:42:59+5:30
आषाढी, कार्तिकी एकादशीला जशी वारकरींना विठ्ठलाला भेटण्याची आस लागते तशीच आस मीरा भाईंदरमधील इच्छुकांना महापौरपदाची लागली आहे.

महापौरपदासाठी मीरा-भार्इंदरच्या इच्छुकांना लागली आस
भार्इंदर : आषाढी, कार्तिकी एकादशीला जशी वारकरींना विठ्ठलाला भेटण्याची आस लागते तशीच आस मीरा भाईंदरमधील इच्छुकांना महापौरपदाची लागली आहे. मीरा भाईंदरचे महापौरपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच काढलेल्या सोडतीवरुन स्पष्ट झाले आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांमध्ये आत्तापासूनच चलबिचल सुरु झाली आहे.
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी सध्या नेतृत्वहीन झाल्याने तूर्तास या पक्षातून महापौरपदासाठी इच्छुकच बाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, मेंडोन्सा यांच्या कन्या कॅटलिन व असेन्ला या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याने त्या विविध पक्षांच्या वजनाचा कानोसा घेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच काँग्रेसमध्ये माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या मातोश्री व माजी उपमहापौर या एकमेव दावेदार असल्याने तूर्तास काँग्रेसमध्ये या पदासाठी काहीजण इच्छुक असले तरी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे.
भाजपात सध्या गटबाजी असल्याने या पक्षांत इच्छुकांची मांदियाळी आहे. परंतु, भाजपा आमदार नरेंद्र मेहता हे राष्ट्रवादीसारखी घराणेशाही सुरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदावर त्यांची भावजय डिंपल मेहता यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी त्याला ब्रेक लावण्यासाठी इच्छुक मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यातच मेहतांचे अंतर्गत विरोधक मानले जाणारे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील हे आपली मुलगी व नगरसेविका कल्पना म्हात्रे यांच्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)