सदस्यत्वासाठी होतेय दमदाटी

By Admin | Updated: May 22, 2016 01:16 IST2016-05-22T01:16:01+5:302016-05-22T01:16:01+5:30

स्थानिक भाजपा आमदार अध्यक्ष असलेल्या श्रमिक जनरल कामगार संघटनेचे सदस्य होण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन जबरदस्तीने अर्ज भरुन घेतले

Membership is to be used as a sticky one | सदस्यत्वासाठी होतेय दमदाटी

सदस्यत्वासाठी होतेय दमदाटी

मीरा रोड : स्थानिक भाजपा आमदार अध्यक्ष असलेल्या श्रमिक जनरल कामगार संघटनेचे सदस्य होण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन जबरदस्तीने अर्ज भरुन घेतले जात असल्याची लेखी तक्रार कर्मचाऱ्यांनी थेट पालिका आयुक्तांकडे करण्यास सुरुवात केली आहे. दमदाटी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी या आधी कारवाईचे आश्वासन देऊनही कारवाई मात्र होत नसल्याने पालिकेतील कर्मचारी संघटनांमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
मीरा भार्इंदर महापालिकेत रयतराज कामगार संघटना ही अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुख्य कर्मचारी संघटना आहे. शिवाय शिवसेना व मनसेची संघटनाही आहे. परंतु इतक्या वर्षात आमच्या संघटनेचे सदस्य व्हा म्हणून कधी कोणी अधिकारी वा कर्मचारी यांना दमदाटी केल्याचे प्रकार पालिकेत झालेले नाही असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
भाजपा आमदार नरेंद्र मेहता नुकतेच अध्यक्ष झालेल्या श्रमिक जनरल कामगार संघटनेने महापालिकेत आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे. आठ जणांच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अन्न निरीक्षक माणिक जाधव, सरचिटणीसपदी प्रभाकर गायकवाड, खजिनदारपदी आमदार मेहतांचे लहान भाऊ विनोद मेहता आहेत. शिवाय नगरसेवक प्रशांत केळुस्कर व मेहतांचे मित्र संजय थरथरे कार्यकारिणी सदस्य आहेत.
पालिकेतील सत्तेच्या आधारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबावतंत्र सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वी स्थायी समिती सभागृहात झालेल्या एका बैठकीनंतर उपस्थित अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांना भाजपाप्रणित कर्मचारी संघटनेचे अर्ज भरुन घ्या, विभागातील कर्मचाऱ्यांनाही सांगा असे भाजपा नेतृत्वाकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यावेळी गायकवाड यांच्याकडून दबाव आणला जात नसल्याचे सांगण्यात आले होते मेहता व महापौर गीता जैन यांचे नाव सांगून त्यांच्या संघटनेचे सदस्य होण्यासाठी दमदाटी व दादागिरी सुरु असल्याचे रयतराजच्या शिष्टमंडळाने आयुक्त अच्युत हांगे यांची भेट घेऊन सांगितले होते. त्यांनी काही अधिकारी व कर्मचारी यांची नावेही आयुक्तांना दिली. संघटनेचा अर्ज भरुन सदस्य न झाल्यास त्यांची नावे लिहून आमदार, महापौर यांना सांगितली जातील असा दम दिला जात आहे. कर्मचाऱ्यांची हजेरी घेणार नाही, रजा मंजूर करणार नाही, बदली करु अशा धमक्या दिल्या जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यावेळी आयुक्तांनीही त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोलावून समज दिली जाईल. नाही ऐकले तर कारवाई करु असे आश्वासन दिले होत . (प्रतिनिधी)

Web Title: Membership is to be used as a sticky one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.