२७ गावांंबाबत आज मंत्रालयात बैठक
By Admin | Updated: December 23, 2016 03:05 IST2016-12-23T03:05:38+5:302016-12-23T03:05:38+5:30
केडीएमसीतील २७ गावांतील पाणीप्रश्न असो अथवा रस्तेविकासाची कामे यांसदर्भात शुक्रवारी मंत्रालयात बैठक होणार आहे.

२७ गावांंबाबत आज मंत्रालयात बैठक
कल्याण : केडीएमसीतील २७ गावांतील पाणीप्रश्न असो अथवा रस्तेविकासाची कामे यांसदर्भात शुक्रवारी मंत्रालयात बैठक होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ वाजता ही बैठक होत आहे. त्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते राजेश मोरे, २७ गावांमधील नगरसेवक, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२७ गावांना अतिरिक्त पाणी देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन दिले होते. मात्र, ते कागदावरच राहिल्याचा आरोप करीत एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा इशारा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी मध्यंतरी दिला होता. तर अतिरिक्त कोट्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे एक प्रकारे श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा टोला भाजपाने लगावला होता. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रस्ते विकासासह अतिरिक्त पाण्याच्या कोट्याप्रकरणी काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.
२७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. पाणीटंचाईमुळे मे महिन्यात या गावांना १७ ते १८ दशलक्ष लिटर पाणी मिळत होते. त्यानंतर चांगला पाऊस होऊनही या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे येथील भाजपा नगरसेवकांनी अलिकडेच महाजन यांची भेट घेत अतिरिक्त ३० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांशी चचेर्नंतर प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. (प्रतिनिधी)