पार्किंगमुळे मीरा-भार्इंदरमध्ये कोंडला पदपथांचा श्वास
By Admin | Updated: March 14, 2017 01:38 IST2017-03-14T01:38:46+5:302017-03-14T01:38:46+5:30
ग्रामपंचायत व नगरपालिका काळापासूनच्या बहुतांश जुन्या इमारती या भार्इंदरमध्ये आहेत. पण या इमारतींमध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागाच नसल्याने येथील रहिवाशांना

पार्किंगमुळे मीरा-भार्इंदरमध्ये कोंडला पदपथांचा श्वास
ग्रामपंचायत व नगरपालिका काळापासूनच्या बहुतांश जुन्या इमारती या भार्इंदरमध्ये आहेत. पण या इमारतींमध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागाच नसल्याने येथील रहिवाशांना आपली वाहने रस्ता व पदपथावरच उभी करावी लागतात. दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या या जुन्या इमारतींच्या परिसरातील रस्तेही आधीपासूनच अरुंद आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे रहदारी व वाहतुकीला अडथळा होतो. आता तर नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या हक्काच्या पदपथांचा बेकायदा पार्किंगसाठी बळी घेतला जात आहे. पदपाथवर काँक्रिटीकरण करुन बेकायदा पार्किंग केली जात आहेत. प्रशासनाच्या भोंगळ कारभार आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे सामान्यांना विनाकारण हा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरुन चालता येत नाही. पदपथावर पार्किंग झाल्याने आम्ही आता चालायचे कुठून असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
आज पाहयला गेले तर प्रत्येक घरात किमान दुचाकी आहे. आता चारचाकी गाडयाही सामान्यांच्या दारी उभ्या राहू लागल्या आहेत. जुन्या इमारतींमध्ये पार्किंगची सोय नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. हे माहित असूनही नव्या टोलेजंग इमारतींच्याबाबतीत ही चूक सुधारायची तर तोच कित्ता पुढे गिरवला जात आहे. याला केवळ पालिकेचे बिल्डरधार्जिणे धोरणच जबाबदार आहे. याचा उत्तम नमुना म्हणजे मीरा रोडच्या म्हाडा, क्लस्टर येथे नव्याने उभ्या राहिलेल्या इमारती. या इमारती बांधताना पार्किंगचा विचारच केला गेला नाही. येथील रस्ते तर अगदी गल्लीबोळा सारखे आहेत. प्रेमनगर, आरएनए ब्रॉडवे, सालासर ब्रजभूमी आदी अनेक वसाहती तर सदस्यांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांनी ओसंडून वाहत आहेत. शहरातील शांती नगर, शांतीपार्क, शीतलनगर, पूनम सागर आदी मोठ्या वसाहतींमध्ये देखील पार्किंगचा प्रश्न जटिल बनला आहे. पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे नागरिक अक्षरश: वैतागून गेले आहेत. नव्या इमारतीत राहणारा हा कुठल्या वर्गातील आहे याची बिल्डर आणि पालिकेला जाण असूनही पार्किंगसाठी जागा न ठेवणे म्हणजे हास्यास्पद आहे.
रस्ते, पदपथ तर सोडाच अगदी नाल्यांवरच्या स्लॅबचा ताबाही बेकायदा पार्किंगसाठी वाहनांनी घेतला आहे. पुरेशी जागा नसल्याने पार्किंगवरुन इमारतींमध्ये वाद होणे हे आता नेहमीचे झाले आहे. पण रस्ता, पदपथावर पार्किंग करण्यावरुनही टोकाची भांडणे होत आहेत. चाळी, गावठण मध्ये सुध्दा वाहने उभी करायला जागेची ओरड होते.
मॉल, चित्रपटगृह, हॉटेल, शोरुम , लॉजींग अशा ठिकाणी तर पार्किंगची सुविधाच नसते. थेट रस्त्यावरच वाहने उभी करावी जातात. जर पार्किंगची आवश्यक जागा वा सोयच व्यावसायिकांकडून केली जात नसल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा का उगारला जात नाही असा प्रश्न सामान्यांना भेडसावू लागला आहे. रस्त्यावर बेकायदा पार्किंगसाठी लॉजमालकांचे हप्ते बांधलेले असल्याचे आरोप तर नेहमीचेच आहेत. कारण पोलीस व पालिकेकडून कारवाई होत नसल्याने त्यात तथ्य असल्याचे सरळसरळ सिद्ध होते.
अरुंद रस्ते त्यातच दोन्ही बाजूला होणाऱ्या बेकायदा पार्किंगचा जाच आपत्कालिन परिस्थतीत तर तीव्रतेने जाणवतो. आग लागली वा एखादी दुर्घटना घडली तर अग्निशमन दलाची गाडी बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहचण्यास या बेकायदा पार्किंगमुळे मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या घटना वारंवार अनुभवयाला मिळत आहे.
भार्इंदर व मीरा रोड या दोन्ही रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंगची समस्या तर फारच जटिल बनली आहे. बहुतांश नागरिक हे मुंबई वा अन्य ठिकाणी कामानिमित्त जात असल्याने ते रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकी आणतात. वेळेच्यादृष्टीने ते सोयीची पडते. पण पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने उपलब्ध पार्किंगमध्ये मुंगीला शिरायलाही वाव नसतो इतकी वाहने लागलेली असतात. या दोन्ही ेस्थानक परिसरात बेकायदा पार्किंगचा त्रास प्रवाशांना तापदायक ठरत आहे.
पार्किंगची सोय व्हावी म्हणून शहरात पालिका व वाहतूक पोलिसांनी १५ मार्गांवर सम-विषम तारखांना पार्किंग ठेवले आहेत. हा प्रयोगही फोल ठरला असून दोन्ही बाजूला सर्रास वाहने उभी जातात. दुकानांसमोर होणाऱ्या पार्किंगमुळे तर दुकानदार व चालक यांच्यात नेहमीच वाद होतात. १६ रस्ते वा ठिकाणांवर नो पार्किंग असतानाही बेधडक वाहने उभी असतात. अशी परिस्थिती असूनही वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेतात.