मीरा-भार्इंदरच्या महापौरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:32 IST2018-02-19T00:32:00+5:302018-02-19T00:32:02+5:30
भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची भावजय व मीरा- भार्इंदर महापौर डिम्पल मेहता यांचे जातप्रमाणपत्र मुंबई शहर जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध ठरवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मीरा-भार्इंदरच्या महापौरांना दिलासा
मीरा रोड : भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची भावजय व मीरा- भार्इंदर महापौर डिम्पल मेहता यांचे जातप्रमाणपत्र मुंबई शहर जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध ठरवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तक्रारदाराने कायम निवासाचा पुरावा नसणे तसेच व्यवसायानिमित्त महापौरांचे वाडवडील आले असल्याने त्यांना राज्याचे मूळ निवासी मानता येत नसल्याच्या हरकती समितीने ग्राह्य धरल्या नाहीत. दरम्यान, समितीच्या निर्णयास उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असताना पालिका निवडणुकीत डिम्पल मेहता या खुल्या प्रवर्गातून भाजपाच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. आमदार मेहता यांचा लहान भाऊ विनोदची पत्नी असलेल्या डिम्पल यांना महापौरपद देण्यात आले. महापौरपदी बसल्यानंतर डिम्पल यांच्या दरजी या जातीच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी मुंबई शहर जिल्हा जातपडताळणी समितीकडून करण्यात आली. जिद्दी मराठा संस्थेचे प्रदीप जंगम यांनी डिम्पल यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेवर तक्रार करून आव्हान दिले होते.
सुनावणीवेळी महापौरांच्या वकिलाने जंगम यांच्यावरच ब्लॅकमेलर असल्याचा लेखी आरोप केला होता. तर, कार्यालयाच्या आवारातच महापौरांचे पती विनोद व साथीदार नितीन पांडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जंगम यांनी विनोदसह पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.